रुग्णालये व आरोग्य केंद्रात १० हजार खाटा रिक्त

JPN NEWS

मुंबई - कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिका आरोग्य विभागाला यश येत आहे. तर कोरोनावर मात करत घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे पालिका रुग्णालये व आरोग्य केंद्रात तब्बल १० हजार १३० खाटा रिक्त असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली. 

रुग्णांच्या संख्येत घट होत असताना, प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. रुग्णालयांमध्ये कोविड १९ बाधितांसाठी उपलब्ध असलेल्या खाटा (बेड) रिकाम्या असण्याचे प्रमाणही वाढले आहे. कोरोना रुग्णालये व कोरोना आरोग्य केंद्र मिळून २२ हजार ७५६ खाटा उपलब्ध आहेत. यापैकी १० हजार १३० खाटा (बेड) रिकामे आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांसह संशयीत रुग्ण आल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करणे शक्य झाले आहे. महानगरपालिका प्रशासनाने ठिकठिकाणी उभारलेली कोरोना काळजी केंद्र व कोरोना आरोग्य केंद्र यामुळे उपचार सुविधांचे विकेंद्रीकरण झाले. तसेच विभागीय नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम) च्या माध्यमातून खाटांचे व्यवस्थापन होऊ लागल्याने त्यामध्ये सुसूत्रता आल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, योग्य उपचार व रुग्णांची योग्य ती काळजी घेणे यामुळे बाधित रुग्ण आढळण्याचे दैनंदिन सरासरी प्रमाण पूर्वीच्या १,४०० वरुन आता १,२०० पर्यंत खाली आले आहे. यातही लक्षणे नसलेल्या बाधितांचे (एसिम्प्टोमॅटिक) प्रमाण सुमारे ८० टक्के झाल्याचे चहल यांनी सांगितले.