मुंबईत पाणी साचले, २४ तासात मुसळधार


मुंबई - मान्सूनच्या आगमनानंतर काही दिवस लांबलेल्या पावसाने शुक्रवारी मुंबईत दमदार हजेरी लावली आहे. सकाळपासूनच जोरदार सुरुवात करून दिवसभर संततधार कोसळला. दादर टीटी, हिंदमाता, सायन, माटुंगा, किंग्जसर्कल, वरळी, कुर्ला, घाटकोपर, अंधेरी, सांताक्रुझ आदी भागात पाणी तुंबले. त्यामुळे काही ठिकाणी बेस्टची वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली. कुलाबा येथे १६०.६ मिमी. तर सांताक्रुझ येथे १०२.७ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शनिवारी हायटाईड असल्याने समुद्राला ४.५७ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. भरती असताना मुंबईकरांनी सावध रहावे, चौपाट्यांवर जाऊ नये असे आवाहन पालिकेने केले आहे.

मान्सून वेळेत दाखल झाला तरी मुंबईत पावसाचा जोर नव्हता. त्यामुळे मुंबईकर दमदार पावसाच्या प्रतिक्षेत होते. अखेर शुक्रवारी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने घामाघूम झालेले मुंबईकर सुखावले. मुंबई व उपनगरात पावसाने सकाळपासूनच जोरदार कोसळल्याने सखल भागात पाणी साचले. सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता, वरळीनाका, धोबीघाट कपपरेड, चिरा बाजार आदी सखल भागात पाणी साचले. काही ठिकाणी बेस्ट वाहतूकही इतर मार्गाने वळवण्यात आली. महापालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रावर शहरात ९५.०४ पूर्व उपनगरांत ६८.४७ तर पश्चिम उपनगरांत ७४.३९ पावसाची नोंदवण्यात आली.

दरम्यान, हवामान विभागाने शुक्रवार व शनिवारी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा दिला आहे. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शिवाय शनिवारी हायटाईड असल्याने समुद्राला ४.५७ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने आपली यंत्रणा सतर्क ठेवली आहे. नरीमन पॉइंट, गवालिया टँक, दादर, वांद्रे, कुर्ला, बीकेसी, अंधेरी, गोरेगाव, मालाड, बोरीवली या केंद्रावर आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवली आहे. तर सर्व चौपाट्यांवर आवश्यकतेनुसार ९४ लाईफगार्ड तैनात ठेवण्यात आले आहेत.
येथे पाणी तुंबले --
हिंदमाता, सायन, किंग्जसर्कल, कुर्ला, अंधेरी, घाटकोपर, चेंबूर, भुलाबाई देसाई रोड, बिंदुमाधव जंक्शन, वरळीनाका, हिंदमाता जंक्शन, धोबीघाट कपपरेड, चिराबाजार, सीपी ऑफिस, चुनाभट्टी, टिळकनगर, दादर, परळ, भायखळा आदी
पावसाची नोंद --
-कुलाबा - ७२ मिमी, नरिमन पॉईंट ५९ मिमी, मलबार हिल ५१ मिमी, दादर ३९ मिमी, भायखळा फायर स्टेशन ३८ मिमी, हाजीअली ३७ मिमी, नायर रुग्णालय ३५ मिमी, धारावी २९ मिमी
२४ ठिकाणी झाडे पडली -
शहरात १०, पूर्व उपनगरांत ५ व पश्चिम उपनगरांत ९ अशा एकूण २४ ठिकाणी झाडे व फांद्या पडण्याच्या घटना घडल्या.
दरडीचा काही भाग कोसळला-
वरळी हिल रोड, जरीमिरी मंदिर जवळ टेकडीवरील मातीचा काही भाग व दगड खाली कोसळले. यात कोणालाही मार लागलेला नाही.