रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करणाऱ्या 7 जणांना अटक


मुंबई - रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करणाऱ्या 7 जणांना अटक करण्यात आली आहे. या औषधाची 30 हजार रुपयांना विक्री केली जात होती. अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) रविवारी रात्री मुलुंड येथे छापा टाकत ही कारवाई केली. यावेळी 13 इंजेक्शनही जप्त करण्यात आले आहेत.

5 हजार 400 रुपयांचे हे इंजेक्शन एका व्यक्तीकडून थेट 30 ते 40 हजारांत विकले जात होते. त्यानुसार पुढील कारवाई करत 7 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती एफडीए आयुक्त अरुण उन्हाळे यांनी दिली. रेमडेसीवीरचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार एफडीएकडून कारवाई करण्यात येत आहे. याआधी मिररोड येथे कारवाई करत दोन जणांना अटक केली होती. तर आता मुलुंड येथून 7 जणांना अटक करण्यात आली.

एफडीएला मुलुंड येथे एक व्यक्ती रेमडेसीवीरचा काळाबाजार करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एफडीएने सापळा रचत एका अधिकाऱ्याने ग्राहक बनून इंजेक्शन मागवले. रात्री हे इंजेक्शन घेताना त्या व्यक्तीला अटक करत त्याच्याकडून 1 इंजेक्शन जप्त केले. त्याची चौकशी केली असता त्याच्या घरी आणखी 6 औषध सापडली. अधिक चौकशीत काळाबाजार करणारी टोळीच असल्याचे समोर आले. त्यात एका औषध विक्रेत्याचा ही समावेश आहे. त्यानुसार 7 जणांना अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.