जानेवारी 2021 पासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू करा - भाजपा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 August 2020

जानेवारी 2021 पासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू करा - भाजपा

मुंबई - यंदाचे शैक्षणिक वर्ष हे जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 असे जाहीर करून 1 जानेवारी 2021 ला शाळा सुरू कराव्यात अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे.

पाटील म्हणाले की, शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या घोषणेत एकवाक्यता नाही. मुख्यमंत्री कधी ऑनलाईन शाळा सुरू करणार असल्याचे सांगतात तर काही वेळेस लवकरच प्रत्यक्ष शाळा सुरू होणार असल्याचे घोषित करतात. कधी मुहूर्ताची तारीख पण सांगतात पुन्हा काहीतरी बदल होतो. यातून या सरकारच्या निर्णयशक्तीवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी काय ते एकदाच शाळा नक्की केंव्हा सुरू होणार याचा मुहूर्त काढावा. या तिघाडी सरकारला अजूनही या विषयाचे गांभीर्य कळले नाही किंवा त्यांच्याकडे यासाठी वेळच नाही असे दिसते. ऑनलाईन शिक्षण हे ग्रामीण भागात किती उपयुक्त आहे हा ही चर्चेचा विषय आहे. सध्या शहरातही नेटवर्कच्या अनंत अडचणींचा सामना करीत असाताना ग्रामीण भागात नेटवर्क मिळेल का याचा विचार करायला हवा. ऑनलाइन शिक्षण हे न परवडणारे माध्यम आहे आणि अध्यापन प्रक्रियेत पूर्णतः यशस्वी नसणारे माध्यम आहे. त्यामुळे शाळांना-प्रत्यक्ष अध्यापनाला पर्यायच नाही. आत्ताची स्थिती पाहता ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत परिस्थिती निवळेल असे वाटते.

त्यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष हे जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 असे जाहीर करून 1 जानेवारी 2021 ला शाळा सुरू होण्याची घोषणा करावी. सहा महिने सत्र पुढे सरकल्याने कुठल्याही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात फारसा फरक पडणार नाही, असेही पाटील यांनी नमूद केले आहे.

Post Bottom Ad