Type Here to Get Search Results !

आशिष शेलारांनी केलं उद्धव ठाकरेंच्या मुलाचं कौतुकमुंबई - महाविकास आघाडीच्या सरकारला वर्षापेक्षाही जास्त कालावधी झाला. या काळात भाजपाचे नेते आणि शिवसेनेचे नेते एकमेकांच्या पक्षातील नेत्यांवर टीका करण्याची एकही सोडत नसल्याचं प्रत्यक्ष दिसून आलं आहे. भाजपाचे राज्यातील नेते तर दररोज महाविकास आघाडी आणि विशेषत: शिवसेनेवर जहरी टीका करताना दिसतात. पण याचदरम्यान भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलावर कौतुकाचा वर्षाव केला.

महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाल्यानंतर आशिष शेलार यांनी सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या चुकीच्या वाटणाऱ्या धोरणांवर टीका केली. पण आज मात्र त्यांनी उद्धव यांचा धाकटा सुपुत्र तेजस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केल्याचं दिसून आलं. निसर्गातील जैवविविधतेवर संशोधन करणाऱ्या तेजस ठाकरे यांनी एक महत्त्वाचे सागरी संशोधन केले. त्यावरून शेलार यांनी त्याची पाठ थोपटली. “उर्जावान तेजस ठाकरेंचे नवीन मत्स्यजीव शोधाकरिता अभिनंदन! करोनाकाळातही ते आपल्या कामाशी दृढपणे कटिबद्ध राहिले व आपल्या कामगिरीतून मत्स्यशास्त्रातील ज्ञानगंगेत भर पाडली, हे कौतुकास्पद! त्यांच्या नवीन वर्षातील वाटचालीस शुभेच्छा!”, असं ट्विट करत त्यांनी तेजस ठाकरेंचे कौतुक केले.

तेजस यांच्या संशोधनाबद्दल …
निसर्गातील जैवविविधतेवर संशोधन करणाऱ्या तेजस ठाकरे यांनी पश्चिम घाट, सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये केलेल्या संशोधनानंतर मेघालयमध्येही महत्त्वपूर्ण संशोधन केले. मेघालयातील खासी टेकड्यांतून तेजस ठाकरे आणि सहकाऱ्यांनी अत्यंत सुंदर आणि तितकाच दुर्मिळ असा ‘चन्ना स्नेकहेड’ हा मासा शोधला. त्यांच्या या संशोधनाची दखल अमेरिकेतील ‘कोपिया- अमेरिकन सोसायटी ऑफ इचिथोलॉजिस्ट अॅण्ड हर्पेटोलॉजिस्ट ऑफिशियल जर्नल’ने घेतली. या जर्नलमध्ये त्यांचे हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

मेघालयातील या संशोधनात त्यांच्यासह जे. कृथ्वीराज, एस. गजेंद्रो, ए. उमा, एन मौलीथरन आणि एम. बँकीट हे संशोधकही सहभागी झाले होते. मेघालयातील डोंगर कपाऱ्या, टेकड्यांमधून फिरताना त्यांना या अत्यंत सुंदर अशा दुर्मिळ माशाचा शोध लागला. या माशाचे वर्णन करणारा शोधनिबंध तयार करून त्यांनी तो अमेरिकेतील ‘कोपिया- अमेरिकन सोसायटी ऑफ इचिथोलॉजिस्ट अँड हर्पेटोलॉजिस्ट ऑफिशियल जर्नल’ला पाठवला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad