लग्न समारंभासह क्‍लब, उपहारगृहे, इतर खासगी कार्यक्रम पालिकेच्या रडावर - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

18 February 2021

लग्न समारंभासह क्‍लब, उपहारगृहे, इतर खासगी कार्यक्रम पालिकेच्या रडावर
मुंबई - मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभासह क्‍लब, उपहारगृहे, होम क्वारंटाईन इतर खासगी कार्यक्रमाच्या ठिकाणी नियम मोडणा-यांवर गुन्हे नोंद करण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. आयुक्तांच्या निर्देशानंतर अशा कार्यक्रम ठिकाणी धाडी टाकून कारवाईची कठोर अंमलबजावणीला सुरुवातही झाली आहे. याशिवाय मास्‍कचा उपयोग न करणा-या नागरिकांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे. यासाठी उपनगरीय रेल्‍वे गाड्यांमध्‍ये ३०० मार्शल्‍सची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना रुग्णांची संख्या आता दुपटीने वाढली आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत असल्य़ाने पालिका सतर्क झाली असून कठोर नियमांची अंमलबजावणी सुरु केली आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर सार्वजिनक ठिकाणी गर्दी वाढते आहे. लग्न समारंभासह इतर सार्वजिनक ठिकाणी गर्दी वाढते आहे. यावेळी सोशल डिस्टनसिंग, मास्कचा वापर न करणे आदी नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांना निर्धारित वेळेत मुंबई लोकल सुरु झाल्यानंतर काही दिवसांतच रुग्णसंख्याही वाढली आहे. अनेक ठिकाणी होम क्वारंटाईनचे नियमही धाब्यावर बसवले जात आहेत. यावर आता नजर ठेवली जाणार असून नियम मोडणा-यांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. चहल यांनी गुरुवारी महानगरपालिकेचे सर्व अतिरिक्‍त आयुक्‍त, परिमंडळीय सहआयुक्‍त, उपआयुक्‍त, सर्व विभाग कार्यालयांचे सहायक आयुक्‍त तसेच संबंधित अधिकारी यांच्‍यासमवेत दूरदृश्‍य प्रणाली (व्हिडिओ कॉन्‍फरन्‍स) द्वारे बैठक घेतली. त्‍यावेळी परिस्थितीचा आढावा घेवून यंत्रणेला आवश्‍यक ते निर्देश दिले.

होम क्वारंटाईनचा नियम मोडल्यास होणार गुन्हा दाखल -
होम क्वारंटाईन राहणा-यांकडून अनेकवेळा नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा क्वांरटाईन होणा-यांच्या हातावर शिक्के मारले जाणार आहेत. त्यांच्यावर पालिकेची नजर असणार आहे. नियम धाब्यावर बसवल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

विनामास्क रेल्वे प्रवाशांवर होणार कारवाई -
लोकमधून विनामास्क फिरणा-यांची संख्या वाढली असून यापुढे मास्क न घालणा-यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी ३०० मार्शलची नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यक भासल्यास मार्शलच्या संख्या दुप्पट वाढवली जाणार आहे. रोज २५ हजार जणांवर कारवाईचे लक्ष्य पालिकेसमोर असणार आहे.

एकाचवेळी ५० पेक्षा अधिक व्यक्ती दिसल्यास दंडात्मक कारवाई -
लग्‍न समारंभाची मंगल कार्यालये, जिमखाना, क्‍लब्‍ज, नाईट क्‍लब्‍ज, उपहारगृहे, चित्रपटगृहे, सर्वधर्मिय स्‍थळे, खेळाची मैदाने व उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल, तसेच सर्व खासगी कार्यालये अशा सर्व ठिकाणी मास्‍कचा वापर बंधनकारक आहे. अशा ठिकाणी धाडी टाकल्या जाणार आहेत. येथे एकाचवेळी ५० पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास व मास्‍कचा वापर होत नसल्यास संबंधित व्‍यक्तिंना दंड करण्‍यासोबत त्‍या-त्‍या ठिकाणच्‍या आस्‍थापनांवर, व्‍यवस्‍थापनांवर गुन्‍हे दाखल केले जाणार आहेत.

होम क्लारंटाईन व्यक्तीच्या हातावल शिक्के मारणार -
लक्षणे आढळत नसलेल्‍या बाधित (असिम्‍प्‍टोमॅटिक) रुग्‍णांना होम क्‍वारंटाईन करण्‍यात येते. अशा रुग्‍णांवर पूर्वीप्रमाणे हातावर शिक्‍के मारण्‍यात यावेत. तसेच त्‍यांची माहिती संबंधित सोसायटींना कळवावी. वॉर्ड वॉर रुम्‍सच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍यावर बारकाईने नजर ठेवावी. अशा व्‍यक्तिंना दिवसातून ५ ते ६ वेळा दूरध्‍वनीवर संपर्क साधून ते घरी असल्‍याची खातरजमा करावी. बाधित व्‍यक्तिंची योग्‍य माहिती ठेवून त्‍यांच्‍या नजीकच्‍या संपर्कातील व्‍यक्तींनाही क्वारंटाईन करावे. तसेच कालावधी पूर्ण होण्‍याआधी रुग्ण घराबाहेर पडला, सार्वजनिक ठिकाणी फिरला तर त्‍याची माहिती सोसायट्यांनी महानगरपालिकेच्‍या वॉर्ड वॉर रुमला कळवावी. वॉर्ड वॉर रुमने अशा रुग्‍णांवर गुन्‍हे दाखल करण्‍याची कार्यवाही करावी. तसेच अशा रुग्‍णांना सक्‍तीने संस्‍थात्‍मक विलगीकरण (इन्‍स्‍ट‍िट्यूशनल क्‍वारंटाईन) करावे अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

इमारतींमध्‍ये पाचपेक्षा अधिक रुग्‍ण आढळल्यास सील -
ज्या रहिवासी इमारतींमध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळतील अशा इमारती सील केल्या जाणार आहेत. अशा इमारतींवर पालिकेचा वॉच राहणार आहे. याबाबत संबंधित सोसायट्यांना पालिकेकडून सूचना दिल्या जाणार आहेत.

प्रत्येक रेल्वे लाईनवर १०० मार्शल -
मुंबईतील पश्चिम, मध्‍य आणि हार्बर उपनगरीय रेल्‍वे सेवांच्‍या गाड्यांमध्‍ये विना मास्‍क प्रवास करणाऱयांवर कारवाई करण्‍यासाठी प्रत्‍येकी लाईनवर १०० प्रमाणे एकूण ३०० मार्शल्‍स नेमण्यात आले आहेत. विनामास्‍क प्रवास करणाऱयांवर कारवाई केली जाणार आहे. यासाठी आता पोलिसांनाही अधिकार देण्‍यात येत असून पोलीसदेखील मार्शल म्‍हणून नागरिकांना दंड आकारुन कारवाई करणार आहेत.

प्रार्थनास्‍थळांच्‍या जागी पुरुषांप्रमाणे महिला मार्शल -
सर्वधर्मिय प्रार्थनास्‍थळांच्‍या जागी पुरुषांप्रमाणेच महिला मार्शल नेमून नियमांचे तेथे पालन होत असल्‍याबाबत लक्ष ठेवण्‍यात येईल. विना मास्‍क फिरणे, ५० पेक्षा अधिक व्‍यक्तिंनी एकाचवेळी एकत्र येणे, अशा नियमांचे उल्‍लंघन केल्‍यास तेथेही कारवाई करण्‍यात येणार आहे.

शोध मोहिम घेऊन तपासणी होणार -
झोपडपट्टी, अरुंद वस्‍ती, दाट वस्‍तींमध्‍ये बिगरशासकीय संस्‍थांच्‍या मदतीने आरोग्‍य तपासणी शिबिरांचे आयोजन करुन संशयितांची तपासणी केली जाणार आहे. फिरत्‍या दवाखान्‍यांच्‍या (मोबाईल व्‍हॅन) माध्‍यमातून रुग्‍ण शोध मोहीम सुरु ठेवली जाणार असून येथे चाचण्‍या केल्या जाणार आहेत.

ब्राझिलमधून भारतात येणाऱया प्रवाशांना संस्थात्मक विलगीकण -
केंद्र सरकारच्‍या नियमावलीप्रमाणे, आता ब्राझिलमधून भारतात येणाऱया प्रवाशांनाही संस्‍थात्‍मक विलगीकरणात रहावे लागणार आहे. यामुळे मुंबई विमानतळावर ब्राझिलमधून येणाऱया प्रवाशांना सक्‍तीने सात दिवसांच्‍या संस्‍थात्‍मक विलगीकरणात ठेवण्‍याचा निर्णय बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला असून त्‍याची अंमलबजावणी सुरु करण्‍यात आली आहे.

Post Top Ad

test