Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

पुढील आठवड्यात राज्यात दिवसाला एक हजार मृत्यू - आरोग्य विभागाने व्यक्त केली भीती



मुंबई - राज्यात चार एप्रिलपर्यंत राज्यातील अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या तीन लाखांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्णवाढ ही पुणे, नागपूर आणि मुंबईमध्ये असेल असं सांगण्यात येत आहे. पुण्यामध्ये ६१ हजार १२५, नागपूरमध्ये ४७ हजार ७०७ तर मुंबईत ३२ हजार ९२७ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. अनेक जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य सेवा अपुऱ्या पडतील असंही सांगितलं जात आहे. नागपूर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवांची संख्या वाढवणं गरजेचं आहे असंही सांगण्यात आलं आहे. तसेच पुढील ११ दिवसांमध्ये मृतांची संख्या ६४ हजारांचा टप्पा ओलांडेल म्हणजेच दिवसाला एक हजार लोकांचा मृत्यू होईल अशी भीती राज्यातील आरोग्य विभागाचे सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी व्यक्त केली आहे. 

महाराष्ट्रामध्ये बुधवारी ३१ हजार ८५५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यात रुग्ण आढळून आलेत. राज्यामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या सध्या २५ लाख ६४ हजार ८८१ इतकी आहे. त्यापैकी दोन लाख ४७ हजार २९९ रुग्ण हे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण म्हणजेच उपचार सुरु असणारे रुग्ण आहेत. राज्यामध्ये सध्या मृतांची संख्या ५३ हजार ६८४ इतकी आहे. बुधवारी राज्यामध्ये ९५ जणांचा करोनामुळे मृत्यू झालाय. करोनाबाधित रुग्णांचे प्रमाण आठवड्याला एका टक्क्याने वाढत असल्याचं सर्व जिल्ह्यांमधून गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होतं आहे. याच आकडेवारीच्या आधारे राज्याच्या आरोग्य विभागाने हा अंदाज व्यक्त केलाय. संकलित करण्यात आलेल्या माहितीच्या आधारे मृत्यू दर हा २.२७ टक्के असल्याचं सांगण्यात आलं आहे. याच दराच्या आधारे पुढील दोन आठवड्यांमध्ये राज्यामधील एकूण करोना रुग्णांची संख्या २८ लाख २४ हजार ३८२ इतकी होईल आणि मृतांचा आकडा हा ६४ हजार ६१३ पर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. म्हणजेच महाराष्ट्रात पुढील दोन आठवड्यांमध्ये करोनामुळे दिवसाला एक हजार जणांचा मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय.

राज्यामध्ये बेड्सची संख्या, आयसीयू बेड्स आणि व्हेटिंलेटर्सची संख्या पुरेशी असली तरी ऑक्सिजन सेवा असणाऱ्या बेड्सची संख्या चार हजारांनी वाढवण्याची गरज आरोग्य विभागाने व्यक्त केलीय. पुढील काही दिवसांमध्ये ठाणे आणि नागपूर या दोन जिल्ह्यांमधील बेडची संख्या वाढवली नाही तर परिस्थिती गंभीर होईल अशी भीती राज्यातील आरोग्य विभागाचे सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी व्यक्त केली आहे. राज्यातील आरोग्य विभागाने सध्या ज्या वेगाने करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे त्याच्या आधारे ही भविष्यातील आकडेवारीसंदर्भातील शक्यता व्यक्त केलीय. मागील तीन ते चार दिवसांमध्ये राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाखांनी वाढली आहे. सध्या एकूण अ‍ॅक्टीव्ह रुग्णांपैकी ४१ टक्के रुग्ण रुग्णालयामध्ये आहेत. त्यापैकी ८ टक्के गंभीर तर ०.७१ टक्के रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. रुग्णांची संख्या पाहून त्या हिशोबाने वेगवेगळ्या ठिकाणी करोना बेड्सची संख्या निश्चित करण्यात यावी असं मत व्यास यांनी व्यक्त केलं आहे. करोनावर मात करुन ठणठणीत झालेल्या, ताप नसलेल्या आणि शरीरामधील ऑक्सिजनचं प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत असणाऱ्यांना कोविड केअर सेंटरमध्ये स्थलांतरित करण्यात यावं असं मत व्यास यांनी व्यक्त केलं आहे. तसेच दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची दर चार तासांनी सहा मिनिटांची चालण्याची चाचणी, ऑक्सिजनचं प्रमाण तपासून पाहणं यासारख्या गोष्टी अंमलात आणल्या पाहिजेत अस मतही व्यास यांनी व्यक्त केलं आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom