ड्राइव्‍ह इन लसीकरण उपक्रमाला भरघोस प्रतिसाद


मुंबई - ज्‍येष्‍ठ नागरिक आणि दिव्‍यांग व्‍यक्तिंना कोविड प्रतिबंधक लस घेण्‍यासाठी सहज, सोपी सुविधा मिळावी म्‍हणून बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या जी/उत्‍तर विभागाने ड्राइव्‍ह इन लसीकरण सुविधा आज (दिनांक ४ मे २०२१) पासून कोहिनूर वाहनतळ येथे सुरु केली आहे. या उपक्रमास पहिल्‍याच दिवशी नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत संकलित माहितीनुसार, एकूण २२७ वाहनांतून आलेल्‍या ३६५ नागरिकांना या केंद्रावर लस देण्‍यात आली होती.

स्‍थानिक खासदार राहूल शेवाळे, स्‍थानिक आमदार सदा सरवणकर, बृहन्‍मुंबई महानगरपालिका सभागृह नेता तथा स्‍थानिक नगरसेविका विशाखा राऊत, जी/उत्‍तर विभागाचे सहायक आयुक्‍त किरण दिघावकर यांच्‍या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी ९ वाजता या ड्राइव्‍ह इन लसीकरण उपक्रमाचा प्रारंभ करण्‍यात आला.

कोविड संसर्ग मुंबईत वाढीस लागल्‍यानंतर दादर (पश्चिम) परिसरातील जे. के. सावंत मार्गावरील कोहिनूर वाहनतळ येथे जी/उत्‍तर विभाग कार्यालयाने ड्राइव्‍ह इन कोविड चाचणी केंद्र सुरु केले होते. या केंद्राच्‍या माध्‍यमातून दादर परिसरातील चाचण्‍यांना वेग देण्‍यास मोठी मदत झाली होती. त्‍च धर्तीवर ड्राइव्‍ह इन कोविड प्रतिबंध लसीकरण केंद्र सुरु करण्‍याचा निर्णय जी/उत्‍तर विभागाचे सहायक आयुक्‍त किरण दिघावकर यांनी घेतला. आजपासून हा उपक्रम प्रत्‍यक्षात सुरु झाला आहे.

कोविड प्रतिबंध लसीकरणासाठी रुग्‍णालयांमध्‍ये निर्देशित केंद्रांवर येणाऱया नागरिकांना सर्व प्रक्रिया पार पडेपर्यंत काही वेळ प्रतीक्षा करावी लागू शकते. तसेच लस घेतल्‍यानंतर त्‍यांना निरीक्षणाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत थांबावे लागते. काहीप्रसंगी अशी स्थिती ज्‍येष्‍ठ नागरिक तसेच दिव्‍यांग व्‍यक्तिंना गैरसोयीची ठरु शकते. सध्‍या घरोघरी जाऊन लसीकरण करण्‍याची मुभा सरकारने दिलेली नाही. त्‍यामुळे यावर मध्‍यम मार्ग म्‍हणून, जी/उत्‍तर विभागाने ड्राइव्‍ह इन लसीकरण उपक्रम सुरु केला आहे. यामध्‍ये ज्‍येष्‍ठ नागरिक, दिव्‍यांग व्‍यक्‍ती इत्‍यादी थेट वाहनात बसूनच लसीकरण केंद्रामध्‍ये येतात व लस घेतात.

कोहिनूर वाहनतळावर एकूण दोन बूथ नेमण्‍यात आले आहेत. तेथे लस घेण्‍यासाठी येणाऱया पात्र नागरिकांनी नोंदणी केली नसेल तर वाहनात बसूनच त्‍यांना नोंदणी देखील करता येते. त्‍यानंतर त्‍यांना लस दिली जाते. तद् नंतर वाहनात थांबूनच त्‍यांना निरीक्षणाचा कालावधी पूर्ण करता येतो. लस घेण्‍यासाठी बूथपासून किमान ५० वाहने एकाचवेळी रांगेत थांबू शकतील आणि निरीक्षण कालावधी पूर्ण करेपर्यंत किमान १०० वाहने एकाचवेळी थांबू शकतील इतकी जागा याठिकाणी उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. निरीक्षण कालावधी दरम्‍यान काही त्रास वाटला तर संबंधित नागरिक हॉर्न वाजवून इशारा करु शकतात. तसेच वाहनांमध्‍ये थांबूनच, लस घेवून ये-जा होत असल्‍याने प्रत्‍यक्ष जागेवर व्‍यक्तिंची वर्दळ होत नाही, परिणामी संसर्गाचा धोका नाहीसा होतो, हे या ड्राइव्‍ह इन लसीकरणाचे फायदे आहेत.

कोहिनूर वाहनतळावरील ड्राइव्‍ह इन लसीकरण केंद्रावर दोन सत्रांमध्‍ये मिळून एकूण ८ डॉक्‍टर, ७० वॉर्ड बॉय, १८ परिचारिका नेमण्‍यात आले आहेत. लससाठा पुरेसा उपलब्‍ध असेल तर दिवसभरात एकूण ५ हजार नागरिकांना लसीकरण करण्‍याची क्षमता या केंद्रामध्‍ये आहे, अशी माहिती सहायक आयुक्‍त दिघावकर यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post