कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यात मुंबई महापालिकेला यश

0


मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यात मुंबई महापालिकेला यश येत आहे. दुसऱ्या लाटेत वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रिटमेंट यावर भर दिल्याने मुंबईतील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक होण्याआधी रोखणे शक्य झाले. मुंबईत ५० फिरते दवाखाने आणि प्रत्येक प्रभागातील वॉर्ड वॉर रूमअंतर्गत १० रुग्णवाहिका तैनात ठेवत बाधित रुग्णांचा शोध घेण्यावर भर दिला. त्यामुळे रोज मिळणारी रुग्ण संख्या ११ हजारांहून तीन ते चार हजारांच्या घरात आणण्यात पालिकेला यश आले आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या त्याचे कौतुक सर्वोच्च न्यायालयानेही केले.

मुंबईत जानेवारी अखेरपर्यंत कोरोना रुग्णसंख्या चांगलीच नियंत्रणात आली. मात्र फेब्रुवारीच्या मध्यापासून दैनंदिन रुग्णसंख्या पुन्हा वेगाने वाढत गेली. यासाठी पालिकेने दैनंदिन चाचण्यांची संख्या तातडीने वाढवून ४५ ते ५० हजारांवर नेली. मात्र चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने आणि कोरोनाच्या वेगाने प्रसाराच्या नव्या स्ट्रेनमुळे पॉझिटिव्ह रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळू लागले. त्यामुळे मुंबईची काळजी वाढली होती. अशा वेळी पालिकेने पॉझिटिव्ह रुग्णांचा मोठ्या प्रमाणात शोध घेऊन प्रत्येक रुग्णामागे १० ते १५ क्लोज काँटॅक्ट शोधून प्रभावी क्वाॅरंटाइन केल्यामुळे आता रुग्णसंख्या चांगलीच आटोक्यात आली आहे.

गर्दी टाळण्यासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेला पोलिसांचेही सहकार्य मिळत आहे. पालिकेच्या माध्यमातून विविध मार्गांनी करण्यात येणारी जनजागृती खूपच महत्त्वपूर्ण ठरत आहे. याशिवाय घरोघरी तपासणी, सर्वेक्षण, औषधोपचार केले जात असल्यामुळे रुग्णसंख्या घटली आहे.

पालिकेच्या २४ वॉर्डामध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी ६ समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांवर ऑक्सिजन पुरवठ्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि पालिकेच्या यंत्रणेत समन्वय साधण्याची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहावा यासाठी पालिकेची महत्त्वाची रुग्णालये आणि जम्बो सेंटरवर १२ ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्याची प्रक्रियाही सुरू आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)