४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची राज्याला चिंता

0


पुणे : राज्यातील ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी लशीचा साठा अत्यंत मर्यादित स्वरूपात उपलब्ध असून केंद्र सरकारने त्यांच्यासाठी तातडीने लशीचा पुरवठा करावा, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जशी लस उपलब्ध होईल तशी ४५ वर्षांवरील नागरिकांना दिली जाईल. मात्र केंद्र सरकारने जर वेळेत लशीचा पुरवठा केला नाही, तर आम्हाला १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना खरेदी केलेल्या लशीचा वापर ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी करावा लागेल आणि दुसरा कोणताही पर्याय आमच्यासाठी उपलब्ध नसेल, असेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

राज्याकडे कोव्हॅक्सिन लशीचा साठा मर्यादित असून केंद्र सरकारने तो योग्य प्रमाणात दिला पाहिजे, तसेच राज्याला रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठाही कमी प्रमाणात होत असून तो केंद्र सरकारने दिला पाहिजे आणि त्यासाठी केंद्राला पत्र लिहून मागणी करणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. स्पुतनिक लशीच्या खरेदीसाठी देखील चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले.

लसीकरणात महाराष्ट्र अव्वल स्थानी असून राज्याने आतापर्यंत १ कोटी ७३ लाख २१ हजार लोकांचे लसीकरण केले आहे. तसेच राज्यातील २८ लाख ६६ हजार ६३१ लोकांना करोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस देण्यात आलेले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)