असली लढाई मुंबई में होगी - देवेंद्र फडणवीस

0


मुंबई - उत्तर प्रदेशसह चार राज्यात विराट विजय मिळाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबई महापालिकेच्या (Bmc) निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. कोणत्याही लढाईने होरपळून जाऊ नका. विजयाने हुरळून जायचं नाही, विजयाने नम्र व्हायचं आहे. विजयाने अधिक मेहनत करायची आहे. अभी तो असली लढाई मुंबई में होगी. आम्हाला मुंबईला कोणत्याही पक्षापासून मुक्त करायचे नाही. आम्हाला मुंबईला (Mumbai) भ्रष्टाचारापासून मुक्त करायचे आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात मैदानात उतरलो आहोत. जोपर्यंत भ्रष्टाचाराच्या विळख्यातून या मुंबईला बाहेर काढत नाही तोपर्यंत दम घेता येणार नाही. म्हणून हा विजय आज साजरा करा. उद्यापासून कामाला लागा. पुन्हा एकदा मुंबईत प्रचंड विजय आणि भाजपचं महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचं सरकार बनविण्यासाठी सज्ज व्हा, असे आदेशच देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले.

गोव्यातील विजयाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांनी मुंबईत सेलिब्रेशनचं आयोजन केलं होतं. ढोल ताशाच्या गजरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यापासून ते आशिष शेलारांपर्यंत सर्वच नेत्यांनी ढोलाच्या तालावर ठेका धरला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं घटनास्थळी आगमन झालं. तेव्हा जोरदार घोषणा देत त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले. तसेच मोदी है तो मुमकीन है, असं सूचक विधानही त्यांनी केलं. महाराष्ट्रातील आमदार, खासदार कार्यकर्त्यांचं आभार. चंद्रकांतदादा तुम्ही महाराष्ट्रातून सेना पाठवली, त्या सेनेचा गोव्याच्या विजयात हात आहे. सेना म्हणजे भाजपची सेना. दुसऱ्या सेनेचं काय झालं ते पाहिलं असेल. त्यांनी भाजपला हरवणार अशी गर्जना त्यांनी केली होती. त्यांची लढाई आमच्याशी नाही नोटाशी होती हे मी सांगत होतो. राष्ट्रवादी आणि सेनेची मते एकत्र केली तरी नोटांची मते जास्त आहेत, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)