कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ, यंत्रणेला दक्ष राहण्याचे मुंबई पालिका आयुक्तांचे निर्देश

JPN NEWS
0

मुंबई - मुंबई महानगरात कोविड विषाणू बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढते आहे. १०० ते दीडशेपर्यंत स्थिर राहिलेल्या रुग्णसंख्येने आता ५०० पार केले आहे. रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेला आणि सर्व संबंधित विभाग व खात्यांना दक्ष राहण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

कोविड-१९ विषाणूच्या पहिल्या आणि दुस-या लाटेचा खंबीरपणे सामना करतानाच मुंबई महानगरात कोविड प्रतिबंधक लसीकरणही वेगाने करण्यात आले आहे. सर्व पात्र घटकांपर्यंत लसीकरण मोहीम पोहोचल्याने कोविडच्या तिस-या लाटेचा प्रभाव अतिशय सौम्य स्तरावरच रोखण्यात महानगरपालिकेला यश आले. मात्र सद्यस्थितीत जगातील विविध देशांमध्ये कोविडचे नवीन उपप्रकार आढळले असून संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मुंबई महानगरात देखील अलीकडे कोविड रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढते आहे. मुंबईत कोविड लसीकरण व्यापक स्तरावर झाले असले तरी गाफील न राहता काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच पावसाळा सुरू होण्याच्या बेतात असल्याने रुग्ण संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे खबरदारी घ्या असे आवाहन आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी केले आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेला व सर्व संबंधित खाते, विभाग यांना दक्ष राहण्याच्या सूचना चहल यांनी केल्या आहेत.

दरम्यान, पावसाळी उपाययोजनांच्या दृष्टीने जम्बो कोविड केंद्रांमध्ये संरचनात्मक स्थिरता, पर्जन्य जल उदंचन यंत्रणा, अग्निशमन उपाययोजना, वैद्यकीय आणि निमवैद्यकीय कर्मचारी, औषधसाठा आणि वैद्यकीय सामग्री, वैद्यकीय प्राणवायू यंत्रणा, आहार, स्वच्छता इत्यादींशी निगडित सर्व बाबी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत आणि त्या सुस्थितीत कार्यान्वित आहेत, याची खातरजमा करावी, असेही आयुक्तांनी आपल्या निर्देशांमध्ये नमूद केले आहे.

उपाययोजनांबाबत यंत्रणांना सूचना-
- बाधित रुग्ण निदान होण्यासाठी कोविड चाचण्या युद्धपातळीवर वाढवाव्यात. त्यासाठी सर्व वैद्यकीय प्रयोगशाळा मनुष्यबळासह सुसज्ज असाव्यात.
- १२ ते १८ वर्षे वयोगटातील पात्र मुला-मुलींच्या कोविड लसीकरणास वेग द्यावा. प्रतिबंधात्मक मात्रा अर्थात बूस्टर डोस घेण्यास पात्र नागरिकांना देखील लस घेण्यास प्रवृत्त करावे.
- जम्बो कोविड रुग्णालयांनी सतर्क राहावे आणि तेथे पुरेशा संख्येने मनुष्यबळ तैनात राहील, याची खातरजमा करावी.
- सर्व सहायक आयुक्तांनी आपापल्या विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्ष अर्थात वॉर्ड वॉर रूममध्ये पुरेसे वैद्यकीय कर्मचारी, इतर कर्मचारी आणि रुग्णवाहिका उपलब्ध राहतील, यादृष्टीने आढावा घ्यावा.
- खासगी रुग्णालयांना देखील सतर्क राहण्याविषयी सूचना द्याव्यात.
- नजीकच्या कालावधीत रुग्णालयांमध्ये दाखल होणा-यांची संख्या वाढू लागली तर रुग्णांना प्राधान्याने मालाड येथील जम्बो कोविड रुग्णालयात दाखल करावे.
- सर्व सहायक आयुक्तांनी आपापल्या विभागात दैनंदिन कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !