Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

आगामी तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा



मुंबई - भारतीय हवामान खात्याकडून (IMD) राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दिनांक ८ जुलै २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोंकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार ( ६४ मिमी ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आला आहे.खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

कोंकण विभागामध्ये पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १००.१ मिमी. पाऊस झाला असून, पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असल्याने आणि भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवीली आहे. पालघर जिल्हा प्रशासन सतर्क असून मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या संपर्कात आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात NDRF ची एक टीम तैनात करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ९३.९ मिमी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत असून सकाळी ८ वाजेपर्यंत उल्हास नदीची पातळी १२.९० मीटर एवढी होती तर उल्हास नदीची इशारा पातळी १६.५० मोटर तर धोका पातळी १७.५० मीटर एवढी आहे. जिल्ह्यात सर्व प्रकारची वाहतूक सुरुळीत सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्ह्यात २ NDRF टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

मुंबईत गेल्या २४ तासात मुंबई कुलाबा येथे ८४ मिमी तर सांताक्रूझ येथे १९३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अंधेरी सब वे टिळक नगर टर्मिनस, टेम्बी ब्रिज परिसर तसेच शेख मेस्त्री दर्गा कुर्ला, दादर टीटी याठिकाणी पाणी साचले आहे. मात्र अद्याप सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत असल्याबाबत BMC नियंत्रण कक्षाने कळविले आहे. मध्य रेल्वे वरील वाहतूक धीम्या गतीने सुरु असून पश्चिम रेल्वे मार्ग सुरळीत आहे. मुंबई मध्ये NDRF च्या ३ टीम या आधीच तैनात आहेत मात्र खबरदारीचा उपाय म्हणून २ अतिरिक्त टीम अशा एकूण ५ टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १३५ मिमी. पाऊस झाला आहे जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सावित्री, कुंडलिका तसेच इतर मोठ्या नद्या धोका पातळीच्या खाली वाहत असून कशेडी घाट मार्गातील वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. पोलादपूर, महाड व माणगाव येथील दरड प्रवण व पूर प्रवण भागातील ५७८ कुटुंब म्हणजे एकूण १७१६ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १४ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे तसेच ३ घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रायगड जिल्ह्यात २ NDRF टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात १५४.८९ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी धोका पातळीवरून वाहत आहे. संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदी, राजापूर तालुक्यातील कोदवली नदी इशारा पातळी वरून वाहत आहेत. सदर भागातील नागरिकांचे आवश्यकतेनुसार स्थलांतर करण्यात येत असून नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे. तसेच वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीकरिता बंद करण्यात आला आहे व वाहतुक अन्य पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. दरड प्रवण व पूर प्रवण भागातील १५२ कुटुंब म्हणजे एकूण ४७९ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३ घरे जमीनदोस्त झाली असून ६७ घरांचे अंशतः नुकसान झाले असून एकूण ५१ गावे बाधित झाली आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात १५५ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरुळीत सुरु आहे. तसेच जिल्ह्यात एका घराचे पूर्णतः तर १४ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रायगड जिल्ह्यात १ NDRF टीम तैनात करण्यात आली आहे.

पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातील परिस्थिती सामान्य असून जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत असून सर्व प्रकारची वाहतुक सुरुळीत सुरु आहे.

कोल्हापूर- जिल्ह्यात सद्यस्थिती मध्ये पूर परिस्थिती नाही मात्र पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या २४ तासात ७ फुटांनी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची सध्याची पाणी पातळी २१.६ फुट असून इशारा पातळी ३९ फुट एवढी आहे. नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने झालेली वाढ आणि पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता NDRF च्या दोन तुकड्या तेनात करण्यात आल्या आहेत. तसेच नदी काठावरील लोकांना सातत्याने सतर्कतेच्या सूचना देण्यात येत असून स्थानिक शोध व बचाव पथके तैनात करण्यात आली आहे.

अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील चांदूरबाजार आणि मोर्शी येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती. तरी खबरदारीचा उपाय म्हणून गावातील २१०२ लोकांना जिल्यातील ७ निवारा केंद्रात हलविण्यात आहे. अद्याप कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीची नोंद नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यात स्थानिक शोध व बचाव पथके कार्यरत आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु असून मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या सातत्याने संपर्कात आहे. पूर परिस्थिती बाबत उपाय योजना म्हणून प्रशासनातर्फे NDRF व SDRF यांच्या तुकड्या पूर प्रवण जिल्ह्यांमध्ये या आधीच तैनात केल्या आहेत.

राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात
मुंबई (कांजूरमार्ग १ घाटकोपर १) -२, पालघर -१,रायगड- महाड- २, ठाणे-२,रत्नागिरी-चिपळूण -२,कोल्हापूर-२,सातारा-१,सिंधुदुर्ग-१ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ टीम तैनात आहेत.तर नांदेड-१,गडचिरोली-१ अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कायमस्वरूपी ९ तुकड्या
मुंबई -३,पुणे-१, नागपूर-१ अशा एकूण ५ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), तसेच धुळे-२,नागपूर-२ अशा एकूण ४ टीम राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या कायमस्वरूपी तुकड्या तैनात आहेत.

राज्य आपत्ती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज दुपारी १२ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिध्दीसाठी देण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom