Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

नैसर्गिक आपत्तीत जीवित हानी होणार नाही यासाठी समन्वयाने काम करा - मुख्यमंत्रीठाणे - नैसर्गिक आपत्तीत जीवित हानी होणार नाही यासाठी यंत्रणांनी समन्वयातून तातडीने मदत व बचावकार्य हाती घ्यावे. जिल्हा प्रशासनातील विभागांनी सतर्क राहून आपत्तीला सामोरे जाण्यासाठी सज्ज रहावे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, महापालिकांनी त्वरित कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे जिल्हा आपत्ती निवारण व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते तर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या पालक सचिव सुजाता सौनिक, पोलीस आयुक्त जय जीत सिंह, ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

अधिकाऱ्यांना क्षेत्रीयस्तरावर काम करण्याच्या सूचना देतानाच अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर काम केल्यास चांगल्याप्रकारे परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येते, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

रस्त्यांवरील खड्डे लक्षपूर्वक भरण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. खड्ड्यांमुळे अपघात होऊन जीवितहानी होऊ नये याची दक्षता घ्या. कोल्ड मिक्स पद्धतीने खड्डे भरा. रस्ते दुरुस्ती करणाऱ्या यंत्रणांनी काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हा प्रशासनाने पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून त्याभागात जीवितहानी होऊ नये याची खबरदारी घेतानाच लोकांना सुरक्षित स्थळी हलवावे. त्याठिकाणी नागरिकांना राहण्याची - जेवणाची चांगली व्यवस्था करण्याचे निर्देशही शिंदे यांनी यावेळी दिले.

वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी दक्षता घ्यावी - 
वीजपुरवठा अखंडित आणि सुरळीत राहील यासाठी सज्ज रहा. लोकांनी तक्रार निवारण केंद्राला दूरध्वनी केल्यास त्यांना प्रतिसाद मिळेल याची काळजी घ्या. त्यांची तक्रार नोंदवून घेण्याची व्यवस्था करा. क्षेत्रीय कर्मचारी, यंत्रणांना आवश्यक सुविधा, उपकरणे तातडीने पुरवावेत, असे निर्देश त्यांनी ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

धरणांमधून विसर्ग करताना त्याची पुरेशी पूर्वकल्पना जिल्हा प्रशासनाला द्यावी. रेल्वेच्या यंत्रणांनी सतर्क राहून मुंबई महापालिकेशी समन्वय ठेवावा. पाणी साचून रेल्वेसेवा विस्कळित झाल्यास प्रवाशांना त्रास होऊ नये याची काळजी घ्या. यासाठी एक समन्वयक अधिकारी ( नोडल) नियुक्त करावा. प्रवाशांच्या सुविधेसाठी बेस्ट, एसटी बसेस किंवा स्थानिक परिवहन सेवा यांची मदत घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

मी जनतेचा सेवक -
पावसाचा जोर वाढत असून आपल्या सर्व यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. शासन आणि प्रशासन यांनी एकत्रपणे काम केल्यास शासनाविषयी चांगली लोकभावना निर्माण होते. लोकप्रतिनिधी आणि शासन ही दोन्ही चाके समान वेगाने लावल्यास चांगले काम होते. मी राज्याचा जनसेवक म्हणून काम करतो आहे. आपत्कालीन परिस्थितीत लोकांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा -
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास, त्यांचे तातडीने पंचनामे करावेत. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी कार्यवाही करण्यात यावी. शासन-प्रशासन आपल्या दारात आले अशी भावना लोकांमध्ये पोहोचायला हवी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom