चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, शेलार मुंबई अध्यक्ष

Anonymous
0


मुंबई - चंद्रकांत पाटील यांचा शिंदे सरकारमध्ये समावेश करण्यात आल्यानंतर भाजपच्या प्रदेशाक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या स्पर्धेतच चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव आघाडीवर होते. त्यानुसार अखेर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेच भाजपचे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आले आहे. तर मुंबईच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बावनकुळे हे ओबीसी नेते आहेत. तर शेलार हे मराठा समाजातून येतात. त्यामुळे भाजपने मराठा आणि ओबीसी नेत्यांना महत्त्वाचे पद देऊन जातीय समीकरणे साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा फायदा भाजपला येत्या काळात होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच बावनकुळे यांनी त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिल्याच्या वृत्ताला दुजोराही दिला आहे.

चंद्रकांत पाटील हे राज्यात कॅबिनेट मंत्री झाले आहेत. त्यामुळे त्यांचे प्रदेशाध्यक्षपद रिक्त होते. हे पद कुणाकडे जाणार याची जोरदार चर्चा होती. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि राम शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. दोन्ही नेते ओबीसी असल्याने ही उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली होती. मात्र, बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्तीय असल्याने त्यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ टाकण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात फडणवीस यांच्याप्रमाणेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही मोठा हात असल्याचे सांगितले जात आहे.

शेलार मुंबईच्या अध्यक्षपदी - 
आशिष शेलार यांची दुस-यांदा मुंबईच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे मुंबईचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांची मंत्रिपदी वर्णी लागणल्यानंतर त्यांचं पद रिक्त होते. त्यामुळे शेलार यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच शेलार यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)