स्वत:ची बाईक चोरीला गेली म्हणून २९ बाईक चोरल्या

Anonymous
0

सोलापूर - सोलापूरमध्ये एका पठ्ठ्याने त्याची बाईक चोरीला गेली म्हणून एक दोन नव्हे तर तब्बल २९ बाईक चोरल्यात. या बाईकचोरासह त्याच्या अन्य साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे. सध्या याप्रकरणी पुढील तपास केला जातो आहे. सोलापूर पोलिसांनी नुकताच दुचाकी चोरणार-या टोळीचा पर्दाफाश केला आहे. 
वाहन चोरणा-या टोळीकडून तब्बल २९ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. सोलापूर मार्केट यार्ड परिसरात गेल्या काही दिवसांत दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याच टोळीने मार्केट यार्डात दुचाकी चोरट्याचा सपाटा लावला होता. अखेर सोलापूर पोलिसांच्या क्राईम ब्रांचने या टोळीच्या मुसक्या आवळल्यात.

सोलापूर क्राईम ब्रांच पोलिसांनी एका संशयित चोरट्याचा तपास सुरु केला होता. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याच्या इतर साथीदारांची कसून चौकशी सुरु केली. यानंतर या चोरट्याच्या अन्य दोघा जणांची माहिती मिळवत पोलिसांनी त्यांनाही अटक केली. एकूण तिघांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून त्यांनी चोरी केलेल्या दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतल्यात. तब्बल २९ दुचाकी या तिघा जणांच्या टोळीने चोरल्या होत्या.

विशेष म्हणजे या टोळीच्या म्होरक्याचे वाहन मार्केट यार्ड परिसरातून चोरीला गेले होते. त्यामुळे रागापोटी त्याने इतर साथीदारांच्या मदतीने एक-दोन नव्हे तर तब्बल २९ मोटारसायकली चोरल्याची कबुली दिलीय. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत एकूण ८ लाख ४५हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ,सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी या संपूर्ण चोरीप्रकरणाची माहिती दिली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)