शिवसेनेच्या दोन्ही गटांचे जोरदार शक्ती प्रदर्शन

0

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच दसऱ्याला दोन वेगवेगळे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. राज्यभरातून शिवसैनिक खाजगी बसेस आणि कारने मुंबईला शिवाजीपार्क व बीकेसीच्या दिशेने घोषणाबाजी करीत मेळाव्याच्या ठिकाणी जमा झाले. चैतत्य, जल्लोषात अवघे वातावरण भगवेमय झाले होते.

शिवसेनेतून उभी फूट पडल्यानंतर दोन्ही गटात राजकीय घमासान सुरु आहे. शिवसेना कुणाची यासाठी संघर्ष सुरु आहे. मागील ५६ वर्षापासून शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. मात्र यंदा शिवसेनेत फूट पडल्याने पहिल्यांदाच दोन्ही गटाने दसरा मेळावा आयोजित करण्यात आला. उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कमध्ये तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीच्या मैदानात होता. या दोन्ही मेळाव्यांना राज्यभरातील हजारोंच्या संख्येने शिवसैनिक जमा झाले. शिवाजी पार्कवर दिंडीने शिवसैनिक मोठा जल्लोष करीत दाखल झाले. आम्ही बाळासाहेबांचे निष्ठावान कार्यकर्ते असे लिहिलेले बॅनर्स, फलक घेऊन शिवाजी पार्कात कार्यकर्ते घोषणाबाजी करीत मेळाव्या ठिकाणी जमा झाले. बीकेसीतही शिंदे समर्थक मोठ्या गर्दीत दाखल झाले. शिवाजी पार्क व बीकेसी मैदान भगवेमय झाले होते. बीकेसीत बाळासाहेबांच्या हुबेहुह वेषात आलेले भगवान शेवडे यांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. वेगवेगळे टिझर सादर करीत वातावरण भारावून गेले होते. शिवाजी पार्कवर दाखल झालेल्या शिवसैनिकांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. महिलांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मेळावा सुरु होण्याआधी आमचीच खरी शिवसेना अशा दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांच्या जोरदार प्रतिक्रिया होत्या. संध्याकाळी सहानंतर दोन्ही मैदाने शिवसैनिकांनी भरून गेली.

शिवसेना खरी असल्याचे सिद्ध करण्यासाठी दोन्ही गटाने आपली ताकद पणाला लावली. दोन्ही गटाकडून होणारी विक्रमी गर्दी पाहता पोलिसांकडूनही सुरक्षेच्या दृष्टीने विशेष बंदोबस्त तैनात केला होता. वाहतूककोंडी लक्षात घेता सकाळी ९ वाजल्यापासून ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आला. मात्र मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर आल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक विभागाने नियोजन केले होते. बेस्टनेही काही मार्गात बदल केले. रेल्वे स्थानकही गर्दीने फुलले होते. त्यामुळे परिसरात पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात होता.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)