मंत्रालयात वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग

Anonymous
0

मुंबई - राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच राज्याच्या प्रशासनाचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयात देखील कर्मचारी आणि अधिकारी महिला सुरक्षित नसल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. मंत्रालयात एका उप सचिवाच्या समोरच उपसंचालक पदावरील महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करण्यात आला आहे. विनयभंग करणारा अवर सचिव आणि ज्याच्या समोर हा प्रकार घडला त्या उपसचिवावर कारवाई करण्याची मागणी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. (senior female officer was molested in Mantralaya)

मंत्रालयातील इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्ये महिला अधिकाऱ्याचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अवर सचिवांच्या कार्यालयात गेलेल्या उपसंचालक दर्जाच्या महिला अधिकाऱ्याचा उपसचिवांच्या समोरच विनयभंग झाला आहे. आता विनयभंग करणारा अवर सचिव आणि ज्याच्या समोर हा प्रकार घडला त्या उपसचिवावर कारवाई करण्याची मागणी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या संदर्भात डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. महिला अधिकारी कामानिमित्त कार्यालयात गेल्या असता एका मंत्र्यांच्या अवर सचिवाने त्यांना 'मला बरे वाटत नाही मी बोअर झालो आहे. मला जरा गाणे म्हणून दाखव,' असे सांगितले. त्या ठिकाणी याच विभागाचे उपसचिव देखील उपस्थित होते, असे डॉ. गोऱ्हे यांनी पत्रात म्हटले आहे. 

१८ ऑक्टोबर २०२२ रोजी ही घटना घडल्यानंतर संबंधित महिला अधिकाऱ्यांनी लेखी तक्रार अर्ज संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे दिला. सचिवांकडे पण तक्रार केली. मात्र, या दोघांकडूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आपल्याकडे ही माहिती आल्यावर आपण संबंधित महिला अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यांच्याकडून सगळे ऐकून घेतले, असेही डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे. १८ ऑक्टोबरला ही घटना घडल्यावर ताबडतोब या महिला अधिकाऱ्याने मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली. त्या ठिकाणी अनेक कार्यालयीन कामासाठी महिला येतात. त्यांना सुरक्षित वाटावे असे वातावरण पाहिजे. त्यामुळे संबंधित अवर सचिव आणि उपसचिव यांना त्यांच्या कार्यातून तात्पुरते कार्यमुक्त केले पाहिजे. यामध्ये स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव यांनी चौकशी करावी, असेही गोऱ्हे यांनी म्हटले आहे.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)