Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

राज्यात एकूण ९ कोटी २ लाख ८५ हजार ८०१ मतदार



मुंबई - भारत निवडणूक आयोगामार्फत दि. १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. यानुसार राज्यात एकूण नऊ कोटी दोन लाख ८५ हजार ८०१ मतदारांची नोंदणी झाली असल्याची माहिती अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यावेळी उपस्थित होते.

देशपांडे यांनी याबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, दि. ०४ ऑगस्ट, २०२२ ते ०७ नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत पूर्व- पुनरीक्षण उपक्रम राबविण्यात आले होते. या कालावधीमध्ये मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणिकरण, दुबार नोंदणीच्या त्रुटी दूर करणे इ. सुधारणा करून दि. ०९ नोव्हेंबर, २०२२ रोजी एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाच्या कालावधीत युवा मतदारांनी तसेच दिव्यांग, महिला, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, तृतीयपंथीय व्यक्ती व विमुक्त भटक्या जमातीतील पात्र व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी याकरिता विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले व त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

भारत निवडणूक आयोगाने राज्यातील विशेषतः असंरक्षित आदिवासी गट (PVTG) प्रवर्गातील पात्र व्यक्तींची १०० टक्के नोंदणी करण्याबाबत निदेश दिले होते. त्याप्रमाणे १०० टक्के नोंदणी केल्याबाबत संबंधित जिल्ह्यांनी प्रमाणित केले आहे. एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर दि. ०९ नोव्हेंबर, २०२२ ते ८ डिसेंबर, २०२२ या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती स्वीकारुन दि. २६ डिसेंबर, २०२२ पर्यंत सर्व दावे व हरकती निकालात काढण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर आज दि. ०५ जानेवारी, २०२३ रोजी अंतिम मतदार यादी संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या अंतिम मतदार यादीनुसार राज्यात पुरूष मतदारांची संख्या ४ कोटी ७१ लाख ३५ हजार ९९९, महिला मतदारांची संख्या ४ कोटी ३१ लाख ४५ हजार ०६७ तर तृतीयपंथीय मतदारांची संख्या ४ हजार ७३५ असून एकूण मतदारांची संख्या ९ कोटी २ लाख ८५ हजार ८०१ असल्याची माहिती देशपांडे यांनी यावेळी दिली. या यादीत नाव आणि इतर माहितीत दुरूस्ती केलेले पुरूष मतदार १ लाख ५२ हजार २५४, महिला मतदार १ लाख ६ हजार २८७ तर तृतीयपंथीय ९० असे एकूण २ लाख ५८ हजार ६३१ मतदार आहेत. ९ नोव्हेंबर २०२२ च्या नोंदणीनुसार राज्यातील मतदारांची एकूण संख्या ८ कोटी ९८ लाख ४२ हजार ३०१ इतकी होती. तर, ५ जानेवारी २०२३ नुसार त्यात वाढ होऊन ती ९ कोटी २ लाख ८५ हजार ८०१ एवढी झाली आहे. एकूण मतदारांपैकी दिव्यांग मतदारांची संख्या ६ लाख ७७ हजार ४८३ इतकी असून, गतवर्षीच्या तुलनेत यात १५ हजार ३३२ ने वाढ झाली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom