Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

म्हाडाची सदनिका विक्रीची सोडत ते ताबा प्रक्रिया संपूर्णतः ऑनलाईन



मुंबई - म्हाडातर्फे उभारण्यात आलेल्या सदनिकांची विक्री करण्यासाठी म्हाडाने आपल्या संगणकीय सोडत प्रणालीत महत्वपूर्ण बदल केले असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ही सोडत प्रक्रिया आता पूर्णपणे मानवी हस्तक्षेपविरहीत करण्यात आली आहे. त्यामुळे सोडत आज्ञावली अधिक पारदर्शक, सुलभ आणि सुरक्षित झाली आहे. सदनिकेसाठी अर्ज करण्यापासून ते ताबा मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन करण्यात आली आहे, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांनी दिली.

म्हाडाच्या राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिकांच्या विक्रीकरिता IHLMS 2.0 (Integrated Housing ottery Management System) ही नूतन संगणकीय सोडत प्रणाली तयार करण्यात आली आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही प्रक्रिया हाताळली जाणार आहे, स्वयंचलित ब्लॉकचेन प्रणालीमध्ये नागरिकांकडून डिजिटल स्वरूपात सादर करण्यात आलेली माहिती व कागदपत्रे कायमस्वरूपी जतन करण्यात येणार आहेत. तसेच ही प्रणाली वेळोवेळी स्वयंचलित अद्ययावत होणार आहे. नागरिकांना सोडतीत सहभाग घेण्याकरिता नोंदणी प्रक्रिया अमर्याद खुली राहणार आहे. नोंदणी प्रक्रियेदरम्यान अर्जदारास एक युनिक क्रमांक प्राप्त होणार आहे व याआधारे अर्जदाराचे स्वतंत्र कायमस्वरूपी प्रोफाइल नूतन संगणकीय सोडत प्रणालीमध्ये तयार होणार आहे, असे डिग्गीकर यांनी सांगितले.

नवीन संगणकीय सोडत प्रणाली म्हाडासाठीच नव्हे तर नागरिकांसाठी देखील एक पर्वणी ठरणार आहे कारण अर्जदारांच्या अर्जाची अचूक पडताळणी या प्रणालीद्वारे त्वरित होणार आहे. प्रचलित सोडत प्रणालीमध्ये सोडतीत यशस्वी झाल्यानंतर अर्जदाराची पात्रता निश्चिती केली जात होती. परंतु, नवीन प्रणालीमध्ये नोंदणीकरण प्रक्रिये दरम्यान म्हाडाने चेकलिस्टनुसार निर्धारित केलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार म्हाडाच्या सदनिका विक्री सोडत प्रक्रियेतील पात्र उमेदवार ठरतील. अशाप्रकारे अर्जदारांची पात्रता सोडतीच्या आधीच निश्चित होणार असून या प्रणालीने पात्र ठरविलेले अर्जदारच सोडतीत सहभाग घेऊ शकतील.

प्रचलित पद्धतीनुसार पात्रता निश्चितीकरिता २१ कागदपत्रे विजेत्या अर्जदारांकडून मागविण्यात येत होती. मात्र, नवीन प्रणाली अंतर्गत केवळ ७ प्रकारची कागदपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. यामधील शपथपत्र, स्वयंघोषणापत्र तसेच स्वीकृतीपत्र यांची निर्मिती संगणकीय प्रणालीद्वारेच केली जाईल व अर्जदाराच्या आधार इ-सिग्नेचर द्वारे त्यावर स्वाक्षरी घेण्यात येणार आहे. हा IHLMS 2.0 प्रणाली शासनाच्या विविध डेटाबेस सोबत जोडली जातील ज्यामध्ये डिजिलॉकर , महा-ऑनलाईन , इनकम टॅक्स, आधार, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र तसेच पीएमएवाय यांच्या एपीआयचा वापर करून अर्जदाराच्या कागदपत्रांची पडताळणी ऑनलाईन पद्धतीने त्वरित करण्यात येणार आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता होऊन अर्जदाराची पात्रता निश्चिती झाल्यानंतर सोडतीतील विजेत्यांना देकार पत्र देखील ऑनलाईन प्राप्त होणार आहे. तसेच अर्जदार आपल्या वैयक्तिक माहितीमध्ये झालेल्या बदलांची नोंद सोडत प्रक्रियेतील प्रोफाईलमध्ये कधीही करू शकतात. तथापि अर्जदारांनी त्यांचे प्रोफाईल वेळोवेळी अद्ययावत ठेवणे गरजेचे असेल. भविष्यात केव्हाही म्हाडाची सोडत जाहीर झाल्यानंतर सोडत प्रणालीने पात्र ठरलेले अर्जदार इच्छुक सदनिकेकरिता अनामत रक्कमेचा भरणा करून सोडतीत सहभाग घेऊ शकतील. तसेच सोडतीत सदनिका प्राप्त झालेल्या यशस्वी अर्जदारांची माहिती देखील या प्रणालीत जतन केली जाणार आहे. अशा अर्जदारांनी नव्याने सोडत प्रक्रियेत पुन्हा अर्ज करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा अर्ज प्रणालीतून रद्द होऊन त्यांना तात्काळ याबाबतची माहिती संबंधितांना भ्रमणध्वनीवर संदेशाद्वारे दिली जाणार असल्याचे डिग्गीकर यांनी सांगितले.

प्रचलित पद्धतीनुसार सोडतीपासून पात्रता निश्चिती ते प्रत्यक्ष ताबा देण्याच्या प्रक्रियेमध्ये मनुष्यबळ आणि अंदाजित एक वर्षाचा कालावधी लागत असतो आणि न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये ८ ते १० वर्ष अथवा अधिक कालावधी लागत असतो. मात्र, नवीन संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून अर्जदाराने निर्धारित सर्व कागदपत्र आज्ञावलीमध्ये अपलोड केल्यास अर्जदाराची पात्रता निश्चिती मानवी हस्तक्षेपाशिवाय विनाविलंब होणार असल्यामुळे कामकाजामध्ये पारदर्शकता येणार आहे. प्रचलित पद्धतीमधील पात्रता निश्चितीकरिता लागणारे प्राधिकृत अधिकारी आणि अपील अधिकारी यांचे मनुष्यबळ आणि वेळ कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच कामकाजामध्ये पारदर्शकता, गतिमानता आणि किमान न्यायालयीन दाव्यांचे उद्दिष्ट साध्य होऊ शकेल, असेही डिग्गीकर म्हणाले.

परंपरागत मानवीय सोडत प्रक्रियेची कात टाकत, सन २००० पासून म्हाडाने सदनिका विक्री करिता पारदर्शक संगणकीय सोडतीचा वापर सुरु केला. या संगणकीय सोडतीच्या पारदर्शकतेवर अवघ्या महाराष्ट्राचा विश्वास संपादन केला आहे. बदलत्या काळाची आव्हाने लक्षात घेता पुन्हा एकदा अत्याधुनिक तंत्रज्ञान व आज्ञावलीचा वापर करून म्हाडाची नूतन संगणकीय सोडत प्रणाली सर्वसामान्य नागरिकांकरिता सहज हाताळण्यायोग्य, सुटसुटीत, सुलभ, सोपी आणि संपूर्णतः ऑनलाईन करण्यात आली आहे.

म्हाडातर्फे अर्जदारांना नवीन प्रणालीबाबत माहिती व मार्गदर्शन मिळण्याकरिता लवकरच मदत कक्ष (Helpline Centre) सुरू करण्यात येणार असून अर्जदारांनी मदत कक्षाच्या ०२२ ६९४६८१०० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom