शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्मृतिस्थळी पूर्वतयारी पूर्णत्वास - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्मृतिस्थळी पूर्वतयारी पूर्णत्वास

Share This
मुंबई / प्रतिनिधी - दादर येथील शिवाजी पार्क येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिस्थळ बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत नैसर्गिकरित्या विकसित करण्यात आले आहे. मंगळवार, दिनांक १७ नोव्हेंबर, २०१५ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त नागरिक या ठिकाणी स्मृतिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी येणार असल्याने महापालिकेने पूर्वतयारीची कामे हाती घेतली असून ती पूर्ण झाली आहे.

स्मृतिस्थळाभोवतीच्या संरक्षक जाळीची रंगरंगोटी करण्यात आली असून आतील परिसरात फुलांनी सजावट करण्यात आली आहे. परिसरात आवश्यक तेथे लाद्यांची दुरुस्ती करण्यात आली असून सोनचाफ्याच्या रोपांचे रोपण करण्यात आले आहे. स्मृतिस्थळ व सभोवती विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शिवाजी पार्ककडे जाणाऱया वीर सावरकर मार्गावरील रस्ता दुभाजक आणि पदपथ यांचीदेखील आवश्यक ती दुरुस्ती आणि रंगरंगोटीदेखील करण्यात आली आहे. स्मारकाच्या दर्शनासाठी येणाऱया जनतेकरीता सुविधा म्हणून पिण्याचे पाणी दोन टँकर्समार्फत उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. शिवाजी पार्क परिसरात स्वच्छता रहावी म्हणून अतिरिक्त कामगार नेमण्यात आले आहेत. याशिवाय परिसरात धूम्रफवारणीदेखील करण्यात आली आहे.

महापालिकेचे सन्माननीय गटनेते यांच्या सभेत आणि महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार महापालिकेने सदर स्मृतिस्थळ विकसित केले असून या स्मृतिस्थळाचे परिरक्षण उद्यान खाते व जी/उत्तर विभाग संयुक्तपणे करीत असते. सदर स्मृतिस्थळ कोणत्याही प्रकारच्या सिमेंट बांधकामाशिवाय फक्त नैसर्गिक दगड, माती, विटा, विविध फुलझाडे यांचा उपयोग करुन विकसित करण्यात आले आहे. स्मारकासाठी महापालिकेने आठशे चौरस फुटाची जागा निर्धारित केली असून सदरहू जागा सागरतटीय नियमन क्षेत्रात (सीआरझेड) तसेच हेरिटेज अंतर्गत येत असल्याने या दोन्हीबाबतीत कार्यवाही पूर्ण करुन हे स्मृतिस्थळ उभारले आहे. स्मृतिस्थळाचा परिसर लाल आग्रा दगडाच्या लादी, माती व हिरवळ इत्यादींनी सुशोभित करण्यात आला आहे. स्मृतिस्थळाच्या ठिकाणी आकर्षक रोषणाईचे प्रकाशदिवे लावण्यात आले आहेत.

हिरवळ व झाडांच्या सिंचनासाठी मैदानात उपलब्ध कूपनलिकांमधून पाण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामध्ये हिरवळीचे गालिचे व विविध १५ प्रकारची शोभिवंत फुलझाडे उदाहरणार्थ पॉइनसेटिया, पिटोनिया, झेंडू, कर्णफुले, एण्झोरा, गोल्डन सायप्रस इत्यादींचे रोपण करुन स्मृतिस्थळ सुशोभित करण्यात आले आहे. या स्मृतिस्थळी बदलत्या ऋतूप्रमाणे त्या – त्या ऋतूत फुलणारी फुलझाडे लावण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी पालिकेतर्फे स्मृतिस्थळ विकसित करण्यात आले आहे, त्याठिकाणी बाळासाहेबांनी आपल्या षष्ठय़ब्दीनिमित्त गुलमोहर झाडाचे रोपटे लावले होते, तर मीनाताई ठाकरे यांनी त्याच परिसरात बकुळीच्या वृक्षाचे रोपटे लावले होते. या दोन झाडांमधील जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिस्थळ साकारण्यात आले आहे.

स्मृतिस्थळ ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती दिन दिनांक २३ जानेवारी, २०१५ पासून अखंड ज्योत प्रज्वलन करण्यात आले आहे. कांस्य (ब्राँझ) धातूपासून निर्मित ३ फूट उंचीची मशाल याठिकाणी तेवत असून त्यास स्टेनलेस स्टील चौकटीसह काचेचे संरक्षित आवरण देण्यात आले आहे. संरक्षित आवरणासह एकूण ६ फूट उंचीची ही अखंड ज्योत आहे. महानगर गॅस कंपनीकडून पाईपद्वारे सदर ज्योतीला अखंड गॅस पुरवठा करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages