महिला सुरक्षा गस्त पथक वाहनांमुळे महिलांवरील अत्याचारास प्रतिबंध होण्यास मदत होणार- मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महिला सुरक्षा गस्त पथक वाहनांमुळे महिलांवरील अत्याचारास प्रतिबंध होण्यास मदत होणार- मुख्यमंत्री

Share This
मुंबई : देशाच्या नकाशावर मुंबई हे नेहमीच सुरक्षित शहर राहिले असून महिला व बालकांच्या सुरक्षिततेबाबत जागृती निर्माण होण्यास महिला सुरक्षा गस्त पथक वाहनांमुळे मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुंबई पोलीस दलातर्फे शहरातील 93 पोलीस ठाण्यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधांसह सज्ज असलेली 5 मोबाईल वाहने खरेदी करण्यात आली असून या वाहनांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते येथील पोलीस जिमखान्यात संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, प्रधान सचिव विजयकुमार, मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, मागील काळात महिला आणि बालकांवरील अत्याचारात झालेली वाढ ही चिंताजनक बाब आहे. महिलांना सुरक्षित वाटण्यासाठी गुन्ह्यांची नोंद होण्याबरोबरच गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. महाराष्ट्र हे नेहमीच महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारे राज्य असून या सुरक्षा गस्त पथकांमुळे समाजातील गुन्हेगारीस चाप बसण्यास मदत होणार आहे. महिला व बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी ही पथके कार्यान्वित करण्यात आली असून या पथकांमुळे मुंबई पोलिसांच्या कार्यात मानाचा तुरा रोवल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

राज्याच्या सुरक्षिततेसाठी मनुष्यबळाच्या वाढीबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब होणे आवश्यक आहे. मुंबई शहराच्या सुरक्षिततेसाठी लवकरच सीसीटीव्हीच्या पहिल्या फेजचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच सीसीटीएनएसच्या माध्यमातून राज्यातील सर्व पोलीस ठाणी संगणक प्रणालीद्वारे जोडली गेली आहेत. यामुळे प्रभावी आणि सक्षम पोलीस फोर्स तयार होण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यास एक स्वतंत्र महिला सुरक्षा गस्त पथक वाहन खरेदी करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करुन तो तातडीने मंजूर करुन घेण्यात आला. या वाहनांमुळे महिला व बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांना आळा बसेल असे बक्षी म्हणाले, मुंबई शहराची आव्हाने मोठी असून सुरक्षित महाराष्ट्राच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल आहे. महाराष्ट्र हे महिलांच्या सुरक्षिततेबद्दल अग्रेसर राज्य असल्याचे प्रतिपादन श्रीवास्तव यांनी केले.

मुंबई पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबवित असून महिला सुरक्षा गस्त पथक वाहने हा या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. या वाहनांमुळे महिलांना तत्काळ सुरक्षा मिळण्यास मदत होईल, अशी माहिती जावेद यांनी प्रास्ताविकात दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages