Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

विजेच्या धक्‍क्‍याने वर्षभरात राज्यात 1500 जण दगावले

JPN NEWS ( Voice Of Citizens ) www.jpnnews.in  मुंबई - महाराष्ट्रात विजेचा वापर कमी असला, तरीही त्यामुळे होणाऱ्या अपघातांतील जीवितहानी मोठी आहे. विजेच्या धक्‍क्‍याने वर्षभरात राज्यात 1500 जण दगावल्याची अधिकृत आकडेवारी सांगत असली, तरी हा आकडा चारपट असल्याची माहिती खुद्द राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी "विद्युत सुरक्षा सप्ताह‘ निमित्त झालेल्या कार्यक्रमात दिली. 


दरडोई 10 ते 12 हजार युनिट वीज वापर असणारे देश जगाच्या पाठीवर आहेत, पण तिथे एकही अपघात होत नाही. महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण एक हजार युनिट म्हणजे दहा पट कमी असूनही अपघाताची आकडेवारी चिंतेत टाकणारी आहे. प्रत्येकाने जबाबदारी घेतली तर हे अपघात कमी होऊ शकतात. सरकारी तसेच खासगी कंपन्यांनी वारंवार अपघात घडणाऱ्या ठिकाणांचा अहवाल महिन्याभरात द्यावा, असा आदेश बावनकुळे यांनी या वेळी दिला.

राज्यात 60 टक्के विद्युत सहायकांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांकडून (टिल्लू) काम करून घेण्यात येते. अनेकदा या टिल्लूंना कोणतेच प्रशिक्षण नसते, त्यामुळे अपघात होतात. अपघात झाल्यावर मात्र विद्युत सहायक आपली जबाबदारी झटकतात. त्यामुळे जे विद्युत सहायक टिल्लूची मदत घेतात, अशा कामगारांना सेवेतून निलंबित करण्यात येईल असाही इशारा त्यांनी दिला.

विजेची कामे करण्यासाठी परवाना मिळवण्यासाठी मुंबईत फेऱ्या माराव्या लागतात, पण यापुढे जिल्हा पातळीवरच इलेक्‍ट्रिक कामासाठी परवाने देण्यात येतील. तसेच खोटे परवाने देणाऱ्यांच्या सीआरमध्ये नोंद करून बढती रोखण्यात येईल, अशीही तरतूद करण्यात आली आहे.

घरात विजेच्या उपकरणांच्या वापरासाठी कोणतेही काम झालेले नसताना इलेक्‍ट्रिकल परवानाधारकाकडून डोळे झाकून काम झाल्याचा शिक्का देण्यात येतो. अभियंताही परवान्याच्या जोरावर कामाची पुनर्पडताळणी करत नाही; त्यामुळे परवानाधारकांची जबाबदारी मोठी राहणार असेही स्पष्ट करण्यात आले.

महापारेषणने राज्यात सात ठिकाणी कौशल्य विकास केंद्राची उभारणी केली आहे. त्यानुसार महावितरणनेही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अधीक्षक अभियंत्याच्या पातळीवर कौशल्य विकास केंद्राची उभारणी करावी. विजेच्या धक्‍क्‍याने दगावणाऱ्यांच्या आकडेवारीत 500 जण कंत्राटी कर्मचारी आहेत; त्यामुळे कौशल्य विकास केंद्रांचा उपयोग अपघात कमी करण्यासाठी गरजेचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom