व्यापारी आणि हॉटेल असोशिएशनचे शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

व्यापारी आणि हॉटेल असोशिएशनचे शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Share This
चलन तुटवड्याबाबत व्यापाऱ्यांनी मांडल्या आपल्या समस्या
मुंबई दि. 22 Nov 2016 
मुंबईतील व्यापारी संघटनेचे पदाधिकारी आणि विरेन शाह यांनी आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. काळया पैशाच्‍या विरोधात पंतप्रधानांनी उचलेल्‍या पावलाचे या संघटनांनी समर्थन केले असून चलन तुटवड्याबाबत व्‍यापाऱयांच्‍या समस्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांपर्यंत पोहोचवाव्यात अशी विनंती या संघटनांनी यावेळी केली.

आज सकाळी ८.१५ वा. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची ही भेट झाली. व्यापारी संघटनेचे विरेन शाह व त्यांचे पदाधिकारी यांच्यासह यावेळी मुंबईतील रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष आदर्श शेट्टी आणि आहार संघटनेचे चेअरमन निरंजन शेट्टी यांचाही समावेश होता. चलन तुटवड्यामुळे व्यापाऱ्यांची होणारी गैरसोय व निर्माण झालेल्या अडचणी यावेळी या संघटनांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. इनकमटॅक्सचा स्लॅब वाढवण्यात यावा अशी मागणी यावेळी व्यापारी संघटनांनी केली. त्याबाबत स्वतंत्र निवेदन तयार करून द्यावे, त्यानुसार आपण केंद्र सरकारशी चर्चा करू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिली. तर डेबिट आणि क्रेडिट कार्डवर व्यवहार करताना जो चार्ज लावला जातो तो रद्द करण्यात यावा. अशी मागणी या संघटनांनी केली. त्याबाबत आपण केंद्र सरकारशी बोलून डिसेंबर, जानेवारी नंतर यावर सकारात्मक तोडगा काढू. अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तर बॅँकेमध्ये पैसे भरण्यासाठी आणि नोटा बदलण्यासाठी वेगळे काऊंटर व्यापाऱ्यांसाठी असावेत अशी मागणी या संघटनांनी केली. त्याबाबतही आपण रिझर्व्ह बँकेशी चर्चा करू असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले. यासह त्यांनी मांडलेल्या अन्य मुद्द्यांबाबत आपण लवकरच केंद्र सरकार आणि पंतप्रधानांशी चर्चा करू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी या पदाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर व्यापारी संघटनांनी समाधान व्यक्त केले.

तर आहार असोसिएशनने परवाने नुतनीकरण प्रक्रिया डिसेंबर मध्ये होताना अन्य शासकीय कर ज्या पद्धतीने पाचशे आणि हजारच्‍या जुन्या नोटांमध्ये स्विकारण्यात येत आहेत त्या पद्धतीने परवाने नुतनीकरण करतानाही जुन्या नोटा स्विकारण्यात याव्या अशी मागणी केली. तसेच छोट्या किंमतीच्या नोटा जास्तीत जास्त चलनात आणाव्यात अशी मागणी केंद्र सरकारकडे करावी अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

दरम्यान दोन्ही व्यापारी संघटनांच्या शिष्टमंडळाबाबत झालेल्या चर्चेत अनेक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ वेळ देऊन व्यापारी संघटनांचे म्हणणे ऐकले आणि त्यावर उपाययोजना करण्याबाबत केंद्र सरकार आणि पंतप्रधानांशी बोलू असे आश्वस्त केले. त्यामुळे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages