जहाज बांधणी व बंदर विकास क्षेत्रात उद्योगांना गुंतवणुकीच्या संधी - उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जहाज बांधणी व बंदर विकास क्षेत्रात उद्योगांना गुंतवणुकीच्या संधी - उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई

Share This
मुंबई, दि. 23 Nov 2016 :
भारताला तसेच महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर सागरी किनारा लाभला आहे. बंदर विकास, जहाज बांधणी या क्षेत्रातील उद्योग वाढीसाठी येथे पोषक वातावरण असून त्यामध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. ही क्षेत्रे वाढण्यासाठी जागतिक कंपन्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यामुळे नॉर्वेमधील उद्योगांनी येथे गुंतवणूक करावी, असे आवाहन उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.

द नॉर्वेजिअन बिझनेस असोसिएशन इंडिया आणि रॉयल नॉर्वेजिअन वाणिज्य दूत यांच्या वतीने आयोजित भारतातील व्यापारासाठी उपयुक्त वातावरणासंदर्भातील ‘बिझनेस क्लायमेट सर्व्हे’ या अहवालाचे प्रकाशन उद्योगमंत्री देसाई यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. नॉर्वेचे मुंबईतील वाणिज्यदूत टोर्बजोर्न होल्थे, डायरेक्टर ऑफ इनोव्हेशन हेल्गे ट्रीटी, द नॉर्वेजिअन बिझनेस असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष रिचर्ड चॅपमन आदी यावेळी उपस्थित होते.

देसाई म्हणाले की, नॉर्वेने केलेल्या या सर्वेक्षणाने भारतातील उद्योगांच्या संधीची माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे, केंद्र व राज्य सरकार, तसेच इतर शासकीय संस्थांसाठीही हे सर्वेक्षण मार्गदर्शक ठरेल. नॉर्वेतील कंपन्यांना येथे गुंतवणुकीसाठी तसेच सध्या महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांना चांगल्या सुविधा व सोयीसवलती देण्यासाठी हा अहवाल उपयुक्त ठरेल. महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. राज्यात दोन मोठी बंदरे व इतर लहान बंदरे आहेत. त्यामुळे राज्यात बंदर विकास व जहाज बांधणी उद्योगांच्या वाढीसाठी पोषक वातावरण आहे. तसेच केंद्र शासनानेही थेट परदेशी गुंतवणुकीची दारे खुली केली आहेत. त्यामुळे राज्यात गुंतवणुकीच्या मोठी संधी उपलब्ध झाली असून या संधीचा नॉर्वेतील कंपन्यांनी लाभ घ्यावा.

होल्थे म्हणाले की, भारतात व्यवसाय उभारणी, त्यासाठीची प्रक्रिया व संधी याची माहिती एकत्र उपलब्ध व्हावी, तसेच येथे बंदर विकास, जहाज बांधणी या सामुद्रिक व्यवसायातील संधींची माहिती नॉर्वेतील व्यावसायिकांना व्हावी, यासाठी हे सर्वेक्षण महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. त्याचा फायदा भारतीय तसेच नॉर्वेतील उद्योगांना होणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages