मुंबई - सचिन माळी, सागर गोरखे, रमेश गायचोर यांना सर्वोच्च न्यायालयात जामीन मंजूर झाला आहे, हे कलाकार पुरोगामी शाहिरांचा वारसा चालवत समाजात जनजागृती व लोकप्रभोधनाचे काम करत होते. कबीर कला मंचच्या या कलावंताना नक्षलवादी ठरवून खटले दाखल करण्यात आले. 2013 पासून हे अर्थर तुरुंगात होते.
पुण्यात सक्रिय असलेल्या कबीर कला मंचचे काही तरुण नक्षलवादी चळवळीत सक्रिय असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सचिन माळी, शीतल साठे व अन्य काही तरुणांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. तेव्हापासून फरार असलेल्या या तरुणांनी एप्रिल २0१३ ला मंत्रालयासमोर आंदोलन करून स्वत:ला अटक करून घेतली होती. यापैकी शीतल साठेची न्यायालयाने जामिनावर सुटका केली होती. तर सचिन माळी गेल्या चार वर्षांपासून तुरुंगातच होते.
सचिन माळी आणि शीतल साठे यांच्या अटकेवरून राज्यात गदारोळ झाला होता. पोलिसांनी मात्र सचिन माळी आणि अन्य तरुणांविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा केला होता. या सर्वांनी सुप्रीम कोर्टात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मंगळवारी झालेल्या सुनावणीत सचिन माळी यांच्यासह सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांची जामिनावर सुटका केली. कबीर कला मंचचा संस्थापक अमरनाथ चंड्डालिया याला दोन वर्षांपूर्वी अटक झाली होती. तेव्हा त्याने दहशतवाद विरोधी पथकासमोर मंचची कार्यपद्धती उघड केली होती. सन २00२ मध्ये चंड्डालिया याने कबीर कला मंचची स्थापना केली. तो २00८ पर्यंत कबीर कला मंचचा सदस्य होता. २00५ मध्ये शीतल साठे, सचिन माळी, रमेश गायचोर, दीपक ढेगळे, सागर गोरखे यांनी कबीर कला मंचमध्ये प्रवेश केला. दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून मे २0११ मध्ये पुणो व ठाणो येथून काही तरुण-तरुणींना अटक केली होती. त्याच वेळी नक्षलवादी अँजेलो हिला अटक केली. सचिन माळी हे कबीर कला मंचमध्ये शाहिरी गीतांसाठी ओळखले जातात.