एनडीए बैठकीला शिवसेनेच्या उपस्थितीने शेतकऱ्यांविषयीचे बेगडी प्रेम चव्हाट्यावर! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एनडीए बैठकीला शिवसेनेच्या उपस्थितीने शेतकऱ्यांविषयीचे बेगडी प्रेम चव्हाट्यावर!

Share This
मुंबई, दि. 10 एप्रिल 2017- शेतकरी कर्जमाफीबाबत शिवसेनेची भूमिका कधीच प्रामाणिक नव्हती. तसे असते तर कर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेना केंद्र आणि राज्यातील सत्तेतून कधीच पायउतार झाली असती. आत्मविश्वास गमावलेल्या उद्धव ठाकरेंनी आता थेट एनडीएच्या बैठकीलाही हजेरी लावली आहे. त्यांच्या एकंदर भूमिकेतून शेतकऱ्यांविषयी त्यांचे बेगडी प्रेम चव्हाट्यावर आल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

प्रवरानगर येथील डॉ. धनंजय गाडगीळ सभागृहात सोमवारी आयोजित अहमदनगर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते जि.प. अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, उपाध्यक्षा राजश्री घुले, सभापती कैलास वाकचौरे, अजय फटांगरे, उमेश परहर आणि अनुराधा नागवडे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी शेतकरी धोरणावरून राज्य सरकारवर जोरदार तोफ डागली.

ते म्हणाले की, विरोधी पक्षांनी संयुक्तरित्या सुरू केलेली संघर्ष यात्रा कर्जमाफी होईपर्यंत थांबणार नाही. मुख्यमंत्र्यांनी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून चार दोन शेतकऱ्यांशी संवाद साधण्यापेक्षा थेट शेतकऱ्यांमध्ये जाऊनच बोलले पाहिजे. राज्यातील शेतकरी सातत्याने कर्जमाफीची मागणी करीत आहेत. मुख्यमंत्री योग्य वेळी कर्जमाफी करण्याचे भाकित करतात. पण् 9 हजार शेतकऱ्यांचे बळी गेल्यानंतर अजून कोणत्या योग्य वेळेची मुख्यमंत्र्यांना प्रतीक्षा आहे? असा सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला.

उत्तर प्रदेशात तेथील योगीबाबांनी अवघ्या 13 दिवसात कर्जमाफीचा निर्णय केला. पण् महाराष्ट्रातील पंताना अडीच वर्षानंतरही हा निर्णय करता आलेली नाही. ‘युपी’ मॉडेलचा अभ्यास करण्याची सबब सांगणाऱ्या या ‘युती’चे मॉडेल आता शेतकरीच मोडीत काढतील, असा इशाराही विरोधी पक्षनेत्यांनी दिला. 3 वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक संकटाना तोंड देतो आहे. या काळात शेतकऱ्यांना भरीव उत्पन्न मिळालेले नाही. कशाबशा पिकलेल्या शेतमालाला हे सरकार हमीभाव देऊ शकले नाही. खरेदी केंद्रांची अवस्था बिकट झाली आहे. म्हणूनच गावोगावी शेतकरी सरकार विरोधात रस्त्यावर उतरल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

संघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांमध्ये अडीच हजार किलोमीटरचा प्रवास केला. संघर्ष यात्रेत शेतकऱ्यांमध्ये उद्रेकाची भावना असल्याचे दिसून आले. कर्जमाफीच्याच मागणीसाठी संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे. नेहमी-नेहमी कर्जमाफी झाली पाहिजे, अशी आमची भूमिका नाही. परंतु, आज शेतकरी प्रचंड अडचणीत असल्याने कोणतीही मर्यादा न घालता त्याला सरसकट 100 टक्के कर्जमाफी मिळायली हवी, अशी आमची मागणी असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने शेतकरी कर्जमाफीचे केवळ राजकारण केले. कर्जमाफीसाठी राजीनामे खिशात घेऊन फिरत असल्याचे सांगणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी अचानक भूमिका बदलली. संसदेत शिवसेनेने कर्जमाफीची मागणी करण्याऐवजी खासदाराच्या विमानप्रवासावर चर्चा केली. कर्जमाफीबाबत शिवसेनेची भूमिका प्रामाणिक नाही. कर्जमाफी होत नाही तोपर्यंत शिवसेनेने एनडीएच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार घालायला हवा होता. परंतु, शिवसेनेला स्वत:ची कोणतीही ठाम भूमिका नसल्याचे टीकास्त्र विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोडले.

ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनीही केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी व सहकार विरोधी धोरणांवर जोरदार टीका केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही अस्थिर करण्याचे काम हे सरकार करते आहे. शेतकऱ्यांनी सुरू केलेला संघर्ष हे सरकार उलथवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत त्यांनी आगामी निवडणुकीत जिल्ह्यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आणण्यासाठी एकत्रित काम करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवानेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. याच कार्यक्रमात मोफत अपघात विमा योजनेअंतर्गत 17 मृतांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages