मुंबई, दि. 30 : मुंबईत फैलावणाऱ्या स्वाईन फ्ल्यु आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील महापालिकेच्या रुग्णालयांना भेटी देत आहेत. आतापर्यंत त्यांनी कस्तुरबा संसर्गजन्य रुग्णालय, के.ई.एम. रुग्णालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयांना आरोग्यमंत्र्यांनी भेटी देवुन रुग्णांची विचारपूस करीत टॅमीफ्ल्यु गोळ्यांचा साठा, विलगीकरण कक्षाच्या सुविधा यांचा आढावा घेतला.
आज आरोगयमंत्र्यांनी कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयाला भेट दिली. महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील खाजगी डॉक्टर व रुग्णालयांची बैठक घ्यावी. खाजगी रुग्णालय व डॉक्टरांनी स्वाईन फ्ल्युच्या आजाराचे लक्षण व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देणारा फलक लावावा यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी संनियंत्रण करावे,असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 100 पेक्षा अधिक ताप, सर्दी खोकला, घशाची खवखव अशी लक्षणे असतील तर अशा वेळेस डॉक्टरांनी एक दिवसाची वाट बघुन रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा न झाल्यास त्याला ऑसेलटॅमीवीर गोळी सुरु करावी. विशेष म्हणजे केंद्राच्या पथकाने याला सहमती दर्शविली आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
मधुमेह, उच्च रक्त दाब तसेच गरोदर माता अशा अतिजोखमीच्या गटाकडे विशेष लक्ष द्यावे. पावसाळ्याचा हंगाम लक्षात घेता जनजागृतीवर भर द्यावा. खासगी डॉक्टरांच्या कार्यशाळा घेण्यात याव्यात. यासाठी महत्त्वाचा दुवा असलेल्या इंडियन मेडिकल असोशिएशनच्या संपर्कात राहावे, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले. जुलै महिन्यापासून प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला गती द्यावी. शाळांमधुन विद्यार्थ्यांना स्वाईन फ्ल्युबाबत जाणीव जागृतीचे धडे द्यावेत, असेही आरोग्यमत्र्यांनी यावेळी सांगितले.
के.ई.एम.मध्ये विलगीकरण कक्ष (आयसोलेशन वॉर्ड) सुरु -
महापालिकेच्या तसेच शासनाच्या रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्ल्युच्या रुग्णांकरीता विलगीकरण कक्ष आवश्यक असून ज्या ठिकाणी असे कक्ष नाहीत तेथे तातडीने सुरु करण्यात यावेत. काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांनी के.ई.एम. रुग्णालयात भेट दिली असता विलगीकरण कक्ष सुरु करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानंतर या रुग्णालयात अशा प्रकारचा कक्ष सुरु करण्यात आला आहे.