मुंबई - मुंबई महानगरपालिकेचे राज्य सरकारकडे पाणीपट्टी, विविध करापोटी १७०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीच्या वसुलीबाबत महापालिका आणि राज्य सरकार कसलेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. जकात रद्द झाल्याने पालिकेचे ७ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने पालिकेला मिळणाऱ्या जकातीमधून मिळणारे ७२०० कोटी रुपये एकत्र दिले असते तर सोहळा करायचा होता, पण सेना - भाजप नाटक करत आहेत असा आरोप रवी राजा यांनी केला आहे. ७ हजार कोटी घेण्या ऐवजी फक्त साडेसहाशे कोटी रुपये स्वीकारण्याचे सोहळे कसले करता ? असा प्रश्न काँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे.
जकातीपोटी नुकसानभरपाईचा पहिला हप्ता बुधवारी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मुंबई महापालिकेला दिला जाणार आहे. या साठी महापालिकेने एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुंबई शहराचे पालक मंत्री सुभाष देसाई, मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह प्रमुख राजकीय नेते व आमदारांना सभागृहात जागा करून देण्यासाठी मोठे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. त्यासाठी सभागृहातील काही बाकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. व्यासपीठामागे आकर्षक शामियाना उभारण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी पालिका सभागृहाची आसनव्यवस्था बदलण्यात आली असून शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांसह आमदार व सर्व नगरसेवकांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. सभागृहातील बदलाबाबत रवी राजा यांच्या सह विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई महानगरपालिका सभागृहाला सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. पालिका सभागृहाचा इतर कार्यक्रमांसाठी वापर करण्याचा पायंडा पडू लागला आहे. या ऐतिहासिक सभागृहात जकातीच्या नुकसान भरपाईचा पहिला हफ्ता घेण्याच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठ उभारण्यात आल्याबद्दल विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जकातीपोटी नुकसानभरपाईचा पहिला हप्ता समारंभपूर्वक देण्याची भाजपला, तर तो स्वीकारण्याची शिवसेनेला घाई झाली आहे, अशी टीका रवी राजा यांनी केली आहे.