मुंबई - गोरक्षणाच्या नावाखाली दलित, मुस्लीम आणि अल्पसंख्याकांवर हल्ले करणाऱ्यां कथित गोरक्षकांवर सरकारने बंदी घालावी अशी मागणी समाजावादी पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष, आमदार अबु आझमी पत्रकार परिषदेत केली. यावेळी गोसंरक्षणासाठी शासनाने शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे आवाहनही आझमी यांनी केली.
आझमी म्हणाले की, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि देशातील भारतीय जनता पार्टीचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये मोठ्या संख्येने अल्पसंख्यांक समाजावर हल्ले होत आहेत. गोमांस खाल्ल्याच्या साध्या संशयावरूनही अल्पसंख्यांना जीवे मारले जात आहे. गोहत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा सरकारने करावी. मात्र अशाप्रकारे कायदा हातात घेऊन गोरक्षणाच्या नावाखाली सुरू असलेली बेबंदशाही सरकारने थांबवण्याची मागणी त्यांनी केली. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकडून नाईलाजास्तव भाकड गाई आणि बैल छुप्या मार्गाने कत्तलखान्याकडे पाठवल्या जात आहेत. त्यांमध्ये हिंदू शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. जर हे प्रकार रोखायचे असतील, तर भाकड जनावरे शासनाने ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. याबाबत शासनाने कारवाई करण्याची मागणी सपाने यावेळी केली. शिवाय सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी ५ जुलै रोजी आझाद मैदानात धरणे देण्याची घोषणाही आझमी यांनी केली.