मुंबई / प्रतिनिधी - घाटकोपर दामोदर पार्कजवळील सिद्धी साई हि चार मजली इमारत मंगळवारी सकाळी कोसळली. या दुर्घटनेत १७ लोक मृत्युमुखी पडले होते. या दुर्घटनेस कारणीभूत सुनिल सितप असल्याचा आरोप असून त्याला न्यालयालयाने पोलीस कोठडी दिली आहे. सितप याला पालिकेच्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्यानेच हि दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. पालिकेच्या प्रशासनावर हे प्रकार शेकणार असल्याने आता सीताप यांच्या इतर अनधिकृत बांधकामांवर पालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
घाटकोपर पश्चिम परिसरात अंधेरी घाटकोपर लिंक रोडवर असणा-या अल्ताफ नगरमध्ये (गोळीबार रोड) एका खाजगी जागेवर अतिक्रमण करुन तिथे अनधिकृतपणे दोन व्यवसायिक आस्थापना सुरु होत्या. यावर महापालिकेने वर्ष २०१० मध्ये कारवाई करुन ही अतिक्रमणे निष्कासित केली होती. तथापि, त्यानंतर सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले होते. याबाबत मा. न्यायालयाने महापालिकेला नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार व संबंधित निकालानुसार आज सदर जागेवरील अतिक्रमण दुस-यांदा निष्कासित करण्यात आले आहे. या कारवाईसाठी मुंबई पोलीस दलाचे विशेष सहकार्य महापालिकेला लाभले, अशी माहिती एन विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांनी दिली आहे. परिमंडळ – ६ चे उपायुक्त नरेंद्र बरडे यांच्या मार्गदर्शनानुसार 'एन' विभागाच्या पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईसाठी महापालिकेचे १५ कामगार-कर्मचारी-अधिकारी घटनास्थळी कार्यरत होते. तर मुंबई पोलीस दलाचे १७ पोलीस कर्मचारी देखील सदर ठिकाणी तैनात होते. ही कारवाई यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महापालिकेच्या 'एन' विभागाचे पदनिर्देशित अधिकारी सादीक खान यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच या कारवाईसाठी एका जेसीबी यंत्रासह २ अतिक्रमण निर्मूलन वाहनांचादेखील वापर करण्यात आला, अशीही माहिती डॉ. कापसे यांनी दिली आहे.