नाशिक : शेतकऱ्याला वीज, पाणी आणि बाजारपेठ मिळावी या त्रिसूत्रीच्या आधारे शासन काम करीत असून त्याद्वारे शेतकऱ्याला सक्षम करीत त्याच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यात येईल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
लासगाव येथे भारतीय रेल्वे व लासलगांव विभाग सहकारी खरेदी विक्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय शीतगृहाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला रेल्वेमंत्री सुरेश प्रभु, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीष महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सिमा हिरे, स्नेहलता कोल्हे, लासलगाव खरेदी विक्री संघाचे चेअरमन नानासाहेब पाटील, कॉनकारचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक व्ही. कल्याण रामा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर.के. यादव, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., सुरेश बाबा पाटील आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, कांद्याची बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हातात असण्यासाठी शेतमालाची साठवणूक करणे आणि योग्य दर मिळाल्यावर विकता येईल यासाठी आवश्यक व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने रेल्वेच्या सहकार्याने शीतगृहाची साखळी निर्माण करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. देशात उभारण्यात येणाऱ्या 227 पैकी 52 शीतगृह महाराष्ट्रात उभारले जात आहे. त्यापैकी 25 पूर्ण झाले असून उर्वरित लवकरच पूर्ण होतील. रेल्वेच्या माध्यमातून विदर्भासाठी 21 हजार कोटींचे, मराठवाड्यासाठी 19 हजार कोटींचे आणि उत्तर महाराष्ट्रात 22 हजार कोटींचे प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत. राज्यातील एकूण एक लाख कोटींचे प्रकल्प रेल्वेच्या सहकार्याने उभारण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभु म्हणाले, राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटीबद्ध असून त्यादृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून या प्रयत्नांना चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून शीतगृहांची उभारणी करण्यात येत आहे. ही सुरुवात असून जगातले सर्वोत्तम तंत्रज्ञान उपयोगात आणीत शेतकऱ्यांचा माल प्रक्रिया करुन बाजारात नेण्याच्या दृष्टीने कन्टेनर कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून राज्याला सर्व सहकार्य करण्यात येईल. राज्य शासनासोबत रेल्वेने अनेक प्रकल्प राबविले आहेत. फळ प्रक्रिया मंत्रालयाशी चर्चा करण्यात आली असून त्यासाठी आवश्यकतेनुसार शीतगृहाची साखळी निर्माण करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.