मुंबई -- नगरसेवकांना अपमानास्पद वागणूक देऊन विकास कामे रखडवणारे व विभागातील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना नगरसेवकांच्या विरोधात प्रशासकीय नियम धाब्यावर बसवून आंदोलनास भाग पाडणारे अंधेरी के- पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी सर्व पक्षीय नागरससेवकांनी सभागृहात केली. पालिका सभागृहात जैन यांच्या मनमानी कारभारा विरोधात उमटलेल्या संतप्त प्रतिक्रिया लक्षात घेऊन याबाबत येत्या आठ दिवसांत जैन यांची चौकशी करून अहवाल सादर करावा व जैन यांच्यावर कारवाई बाबत सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय घेऊ असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले.
अंधेरी के पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्र जैन यांच्याकडून नगरसेवकांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप करीत त्यांच्या मनमानी कारभाराविरोधात गेल्या सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. जैन यांच्या आदेशाने विभागातील बांधकामांवर मनमानीपणे कारवाई सुरू असून विकासकामेही रखडली आहेत, असा आरोप करून जैन यांना तातडीने निलंबित करावे व निषेध म्हणून सभा तहकूब करावी अशी जोरदार मागणी नगरसेवकांनी केली. याची दखल घेत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी जैन यांच्या ‘कारभारा’ची चौकशी करून येत्या सभागृहात अहवाल सादर करावा असे आदेश प्रशासनाला दिले. निषेध म्हणून सभागृह तहकूबही करण्यात आले होते. जैन यांच्या विरोधात चौकशी करून आयुक्तांनी त्याचा अहवाल सादर करावा असे आदेशही महापौरांनी दिले होते.
त्यानुसार सोमवारी झालेल्या महासभेत हा विषय पुन्हा चर्चेसाठी आला. सभागृह नेते यशवंत जाधव यांनी याबाबत निवेदन करून आयुक्तांनी सभेत उपस्थित राहण्याची मागणी केली. त्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी ही मागणी लावून धरली. त्यानंतर पालिका आयुक्त अजोय मेहता सभागृहात उपस्थित राहिले. चर्चेला उत्तर देताना आयुक्त म्हणाले की, नेमकी कोणती तक्रार आहे की ज्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली? सरकारी सेवेत असलेल्या अधिकारी, कर्मचा-यांनी नगरसेवकांविरोधात काळ्या फिती लावून भाषणे करणे, आंदोलन करणे उचित नाही. त्यासाठी वेगळे पर्याय असतात. त्यांनी लोकप्रतिनिधींचा आदर करायला हवा असे सांगून या मुद्द्यावर अधिकारी, संबंधित नगरसेवक यांच्याशी लवकरच बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.