भाडेतत्वावरील घरे योजनेअंतर्गत पोलिसांना मिळणार मालकी हक्काचे घर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 July 2017

भाडेतत्वावरील घरे योजनेअंतर्गत पोलिसांना मिळणार मालकी हक्काचे घर


मुंबई, दि. १३ : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने भाडेतत्त्वावरील घरे योजनेअंतर्गत तयार होणाऱ्या महानगर क्षेत्रातील सदनिकांमधील पाच टक्के सदनिका या पोलिसांसाठी तसेच पाच टक्के सदनिका वर्ग तीन व वर्ग चारच्या प्राधिकरणाच्या व शासकीय कर्मचारी यांच्यासाठी मालकी तत्वावर देण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

एमएमआरडीएच्या संचालक मंडळाची १४३ वी बैठक आज मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यू.पी.एस. मदान, अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे,गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष भूषण गगराणी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, संजय खंदारे आदी यावेळी उपस्थित होते.

प्राधिकरणाच्या वतीने भाडे तत्वावरील घरे योजनेअंतर्गत सदनिका बांधून वाटप करण्यात येतात. या योजनेअंतर्गत पालिका तसेच नागरी क्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या व त्या सदनिकांच्या वाटपाचे धोरण न ठरलेल्या ३२० चौरस फूटाच्या २१ हजार ६७२ सदनिकांच्या वाटपाचे धोरण यावेळी ठरविण्यात आले. या सदनिका ठाणे महानगरपालिका व मिरा-भाईंदर महानगरपालिका आणि प्राधिकरणाच्या क्षेत्रात आहेत. या सदनिका प्राधिकरणाच्या वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांसाठी १टक्के व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ४ टक्के अशा एकूण १ हजार ८४ सदनिका राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच उर्वरित सदनिकांमधील पाच टक्के म्हणजे सुमारे १हजार ८४ घरे या पोलिसांना मालकी तत्वावर देण्यासाठी राखीव ठेवण्यात यावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील नावडे फाटा जंक्शन येथे प्रस्तावित उड्डाण पुलाच्या वाढीव६३.२८ कोटीच्या सुधारित प्रस्तावास यावेळी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. प्राधिकरणाच्या वतीने भिवंडीमधील माणकोली येथे बांधण्यात येत असलेल्या रस्त्यासाठी जमिनीच्या वापर फेरबदलास यावेळी मान्यता देण्यात आली. यावेळी मदान यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त व कार्य अहवाल मांडला.

Post Bottom Ad