राज्यातील अभ्यासक्रम सीबीएसईच्या धर्तीवर करणार - विनोद तावडे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्यातील अभ्यासक्रम सीबीएसईच्या धर्तीवर करणार - विनोद तावडे

Share This

मुंबई, दि. २८ : राज्यातील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना केंद्रीय पातळीवरील परीक्षांमध्ये स्पर्धा करण्याच्या दृष्टीने अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमात व मूल्यमापनात आवश्यक बदल करण्यात येणार असून, राज्यातील अभ्यासक्रम सीबीएसईच्या धर्तीवर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली. राज्यातील अभ्यासक्रम सीबीएसईच्या धर्तीवर करण्याच्या शासनाच्या निर्णयाबाबत सदस्य प्रशांत ठाकूर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना तावडे बोलत होते.

तावडे म्हणाले, उच्च माध्यमिक स्तरावर अकरावी आणि बारावीला दरवर्षी वेगवेगळी परीक्षा घेण्यात येते. एनईईटी आणि जेईईच्या परीक्षेसाठी विद्यार्थी सक्षम व्हावा या उद्देशाने अकरावी वबारावी विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम सीबीएसईच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमात होणा-या बदलांमुळे नवीन पाठ्यपुस्तके शाळेत उपलब्ध केली असून, ज्या शाळांना डेपोतून पुस्तके घ्यावी लागत होती त्यांना ती पुस्तके पोहोचण्यास उशीर झाला आहे. मात्र, आता पुस्तके उपलब्ध असल्याची माहितीही तावडे यांनी दिली.

तावडे म्हणाले, मुंबई, नागपूर, पुण्यासोबत राज्यात अनेक ठिकाणी इंटीग्रेटेड कोर्स सुरू आहेत. ज्या कनिष्ठ महाविद्यालयात असे शिक्षणक्रम सुरू आहेत, अशा महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये. जून २०१८ नंतर इंटीग्रेटेड कोर्सच्या विद्यार्थ्यांना बाद करण्यात येईल व त्यांना बारावीच्या परीक्षांना बसता येणार नाही, अशी माहितीही तावडे यांनी विधानसभेत सांगितले. यावेळी सदस्य ॲड. आशिष शेलार, आशिष देशमुख, अस्लम शेख यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages