नालेसफाई योग्य पद्धतीने झाली म्हणूनच पाणी साचून राहिलेले नाही - उद्धव ठाकरे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नालेसफाई योग्य पद्धतीने झाली म्हणूनच पाणी साचून राहिलेले नाही - उद्धव ठाकरे

Share This

मुंबई - 'नालेसफाई न झाल्याने काल मुंबईत पाणी साचलं हा आरोप जर कुणी करत असेल तर तो खोटा आरोप आहे' असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि काम करणाऱ्या शिवसैनिकांची पाठ थोपटली आहे. काल मुंबई ठप्प झाली हे मी मान्य करतो, मात्र हे नैसर्गिक संकट असून या परिस्थितीला कोण जबाबदार आहे हा प्रश्न विचारण्यापेक्षा ही परिस्थिती कशी हाताळली हे महत्त्वाचे असल्याचे उद्धव म्हणाले. नालेसफाई योग्य पद्धतीने झाली म्हणूनच मुंबईत पाणी कुठे साचून राहिलेले नाही असेही उद्धव म्हणाले.

मुंबईत काल झालेल्या मुसळधार पावसावर आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई महापालिकेची पाठ थोपटली. मनपाच्या कामांमुळे दुसऱ्याच दिवशी मुंबई पूर्वपदावर आली. असा दावा यावेळी उद्धव ठाकरेंनी केला. बेस्ट आणि पालिका कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सजगतेबाबतही उद्धव ठाकरेंनी त्यांचे आभार मानले. याचवेळी उद्धव ठाकरेंनी टीकाकारांनाही उत्तर दिलं. ‘टीका करणारा खरा मुंबईकर नाही. असा टोला त्यांनी हाणला. काल मुंबईच्या डोक्यावर 9 किमी उंचीचा मोठा ढग होता. सुदैवानं तो फुटला नाही. नाहीतर परिस्थिती आणखी बिकट झाली असती. अशी माहितीही उद्धव ठाकरेंनी दिली.

पावसाच्या तडाख्याने मुंबईत दाणादाण झाली हे खरे आहे. पावसाचे राजकारणी मी ही करू शकतो. पण, मला नीचपणा करायचा नाही आणि त्यापातळीवर मी जाणार नाही, ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी ते खुशाल करावे असे खडेबोल मित्रपक्ष भाजपसह विरोधकांना सुनावले.

नाले सफाई झाली नाही असं ज्यांचं म्हणणं आहे अशांनी मुंबईतील नाल्यांमध्ये उतरून गाळ दाखवावा असं आव्हानही उद्धव ठाकरे यांनी विरोधकांनी दिलंय. काल मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे कुणीही राजकारण करू नये. आपल्यालाही राजकारण करता येतं, मात्र असे संकट कोसळल्यानंतर राजकारण करण्याची माझी इच्छाही नाही आणि मानसिकताही नाही. जे आरोप करतात अशांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी मी बांधिल नाही असेही उद्धव पुढे म्हणाले.

आजची मुंबई पूर्वपदावर आलेली दिसते ते महापालिकेचे कर्मचारी आणि शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून काम केले म्हणूनच असे म्हणत उद्धव यांनी कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. मी टीका करणाऱ्यांसाठी नाही, तर जनतेसाठी काम करतो असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages