मुंबई महापालिकेच्या ॲप, संकेतस्थळाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 December 2017

मुंबई महापालिकेच्या ॲप, संकेतस्थळाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ


मुंबई, दि. ६ : मुंबई महापालिकेच्या ॲप आणि संकेतस्थळामुळे नागरिकांसाठीच्या महत्त्वपूर्ण अशा सेवा कार्यक्षम आणि पारदर्शकपणे उपलब्ध होणार आहेत. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारे अद्ययावत तंत्रज्ञानाचा सेवा क्षेत्रात वापर करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न अभिनंदनीय आहे,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. मुंबई महापालिकेच्या MCGM 24 x 7या मोबाईल ॲपचा तसेच आणि One MCGM GIS या संकेतस्थळाचा सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमास महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, महापालिकेच्या बांधकाम विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे, एमसीएचआय, क्रेडाई, नरेडको आणि पीईएटीए या बांधकामव्यवसायाशी संबंधित संघटनांचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री म्हणाले, नागरिकांसाठीच्या प्राधान्यसेवा क्षेत्रात अद्ययावत डिजिटायझेशन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून घेण्याचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. या क्षेत्रात पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्याच्या दृष्टीने या बाबी महत्त्वाच्या आहेत. या ॲप आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांसाठी चांगल्या सेवा देता येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या रेरा याकायद्यालाही उच्च न्यायालयाने योग्य ठरविले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम क्षेत्रातील पारदर्शकता आणण्याच्या प्रयत्नालाही बळ मिळाले आहे. त्या अनुषंगानेही मुंबई महापालिकेने सुरु केलेल्या सेवा समयोचित ठरल्या आहेत. यासाठी देशात पहिल्यांदाच अशाप्रकारचे ॲप आणि संकेतस्थळ सुरु केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांसह, या प्रणालीच्या विकासात योगदान देणाऱ्या विविध घटकांचेही अभिनंदन केले. सुरुवातीला आयुक्त मेहता यांनी संकेतस्थळ व ॲपच्या वैशिष्ट्यांबाबत तपशीलवार माहिती दिली. 

Post Bottom Ad