नवी मुंबई - तेजस्वी पत्रकारितेच्या परंपरेत डॉ. बाबासाहेबांची पत्रकारिता बेदखल राहिली, त्यांच्या पत्रकारितेची फारशी चर्चाही होताना दिसत नाही. सर्व उपेक्षित दुर्बल मागास घटकांचे प्रतिनिधित्व करणारी त्यांची पत्रकारिता बाजूला ठेवून पत्रकारितेची परंपरा पूर्ण होणार कशी? असा सवाल करून बाबासाहेबांची पत्रकारिता समाज परिवर्तनाची पत्रकारिता होती. त्यामुळेच दखल घेतली जात नाही, असे परखड मत दै. 'पुण्य नगरी'च्या मुख्य संपादक राही भिडे यांनी व्यक्त केले. खारघर, उत्सव चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवात आयोजित केलेल्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची पत्रकारिता' या विषयावर त्या बोलत होत्या. अंबिरा संस्थेसह दहा संस्थांनी एकत्र येऊन आंबेडकर विचार महोत्सवाचे आयोजन केले होते. .
त्या पुढे म्हणाल्या की, १८७७ मध्ये कृष्णाजी भालेकर यांनी 'दीनबंधू' हे वर्तमानपत्र सुरू केले. त्यानंतर 'दीनमित्र', 'शेतकऱ्याचा आसूड' ही पत्रे महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रेरणेतून निघाली. मात्र प्रस्थापितांनी त्या वर्तमानपत्रांची दखल घेतली नाही. त्यांना महत्त्व दिले नाही. डॉ. आंबेडकरांनी 'मूकनायक' हे पहिले वृत्तपत्र १९२० साली सुरू केले. त्यानंतर 'समता', 'बहिष्कृत भारत', 'प्रबुद्ध भारत' अशी वृत्तपत्रे सुरू केली. पैशाअभावी ती बंद पडली. परंतु जाहिराती घेण्याबाबत त्यांची नैतिकता उच्च दर्जाची होती. अभिरूची हीन जाहिराती घेण्यास त्यांचा सक्त विरोध होता. या वृत्तपत्रातील आशयावर मतप्रदर्शन होत नव्हते. ऱ्हस्व-दीर्घाच्या चुका मात्र काढल्या जायच्या. तेजस्वी पत्रकारिता जांभेकर ते खाडिलकर यांच्यापुरती मर्यादित कशी, असा सवाल त्यांनी यावेळी केला. तेव्हा २५ टक्के लोकांना शिक्षणाचा अधिकार होता. ७५ टक्के लोक अशिक्षित होते. फुले-आंबेडकरांची पत्रकारिता अशिक्षित मागासांच्या सुधारणेसाठी होती, असे त्यांनी सांगितले. पत्रकारितेत केवळ 'केसरी'चे दाखले दिले जातात, पण त्याच काळात असलेल्या 'दीनबंधू', 'दीनमित्र' अथवा 'मूकनायक'चे दाखले दिले जात नाहीत, ही खेदाची बाब आहे.
No comments:
Post a Comment