मुंबई - मुंबई महापालिकेची मोठी रुग्णालये म्हणून ओळख असलेल्या केईएम, सायन व नायर रुग्णालयातील रक्तपेढयांमध्ये मागील काही दिवसांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने गरीब व गरजू रुग्णांचे हाल होत आहेत. रक्तपेढ्यांमध्ये दिवसाला 250 ते 300 बाटल्यांची गरज असताना सध्या फक्त 25 ते 40 बाटल्याच रक्त उपलब्ध होत आहे. रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने काहीवेळा शस्त्रक्रियाही पुढे ढकलाव्या लागल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. रक्तदान शिबिरे मोठ्या प्रमाणात होत नसल्याने हा रक्ताचा तुटवडा अजून अडीच महिने राहणार आहे.
मुंबई महापालिकेच्या केईएम, लोकमान्य टिऴक व नायर रुग्णालयात मुंबईसह राज्यभरातून हजारो गरीब रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. रुग्णांना रक्त वेळेत मिळावे यासाठी रुग्णालयांचाही प्रयत्न असतो. त्यासाठी सातत्याने रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्ताचा साठा केला जातो. मात्र एप्रिल ते जून या महिन्यांत शाळा, महाविद्यालयांना सुट्टया असल्याने अनेकजण गावी जातात. त्यामुळे या कालावधीत आयोजित करण्यात येणा-या शिबिरांना अल्प प्रतिसाद मिळतो. गेल्या काही दिवसांपासून रक्तपेढ्यांत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. मे महिना या सुट्टीच्या दिवसांत रक्ताचा तुटवडा अधिक भासतो. दिवसाला साधारणतः 250 ते 300 बाटल्यांची आवश्यकता असते. मात्र त्यावेळी अगदी कमी बाटल्या उपलब्ध असतात. काही शस्त्रक्रियाही पुढे ढकलल्या जातात. आतापासूनच रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या गृहनिर्माण सोसायट्या, संस्था, संघटनांच्या सहकार्याने नियमित शिबिरे आयोजित करून रक्ताचा स्टॅाक वाढवण्याचा रुग्णालयांचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, पावसाळ्यात साथीच्या आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. यावेळी रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी रक्ताचा पुरेसा साठा वाढवण्याचा प्रयत्न रुग्णालयांचा आहे. लोकांनी शिबिरांत मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहनही रुग्णालयाने केले आहे.
रक्तदानासाठी पुढे यावे -
रक्तदानासाठी पुढे यावे -
मे महिन्यांत सुट्टीच्या कालावधीत रक्तदान शिबिरांना तेवढा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे रोजच्या स्टॅाकमध्ये रक्ताच्या बाटल्या कमी उपलब्ध होतात. म्हणजे तुटवडा म्हणता येणार नाही, पण रुग्णांना हवे ते रक्त मिळणे कठीण जाते. सुट्टीचा कालावधी संपला की आवश्यक पुरेसे रक्त उपलब्ध होते. रुग्णालयांकडून रक्तदान शिबिरे सातत्याने आयोजित केली जातात. रक्तदानासाठी सर्वांनी पुढे यायला हवे.
- डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता - केईएम
No comments:
Post a Comment