आठ हजार पैकी पावणेसात हजार अर्ज धूळखात पडून
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर स्वच्छता मोहिमा सुरू करण्यात आली. या योजनेचा एक भाग म्हणून स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरोघरी शौचालय बांधणी करण्याची घोषणा करण्यात आली. मुंबईत मात्र या योजनेचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे. मुंबईकरांनी महापालिकेकडे यासाठी 12 हजार अर्ज केले, त्यातील मंजूर झालेल्या 8 हजार अर्जंदारांपैकी आतापर्यंत फक्त एक हजार शौचालय बांधून पूर्ण झाली आहेत. उर्वरित मंजूर झालेले पावणेसात हजार अर्ज मागील दीड वर्षपासून पालिकेकडे धुळखात पडून आहेत.स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालिकेने घरोघरी शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. झोपडपट्ट्यांजवळ शैौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने तेथील रहिवाशांना उघड्यावर शौचास जावे लागते. त्यासाठी घराच्या अगदी जवळपास शौचालय निर्माण केल्यास उघड्यावर जाणा-य़ांची संख्या कमी होऊन मुंबई स्वच्छ राहण्यास मदत होईल हा उद्देश या योजनेमागचा आहे. सरकारकडून यासाठी निधीही उपलब्ध झाला आहे. घरोघरी किंवा घराच्या जवळपास शौचालय उभारण्यासाठी नागरिकांकडून पालिकेकडे तब्बल 12 हजार अर्ज आले. छाननीनंतर त्यातील आठ हजार अर्जांना मंजुरी देण्यात आली. त्यातील आतापर्यंत एक हजार 75 शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत. मात्र अद्यापही पावणेसात हजार अर्जदार शौचालयाच्या प्रतीक्षेत आहेत. अर्ज भरून दीड वर्षाचा कालावधी उलटला तरी ही प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. मुंबईत 50 टक्के जागेवर मलनिःसारण वाहिनी नाही. झोपडपट्ट्यांत जागा अपुरी असल्याने अशी लाईन टाकणे शक्य नसल्याने अशा प्रकारच्या योजना प्रत्यक्षात उतरवताना उशीर होतो. अशी कबुली प्रशासनाने वर्षभरापूर्वी स्थायी समितीत दिली होती. मात्र त्यानंतरही गेल्या वर्षभरात पर्याय काढण्यात न आल्याने या योजनेचा बोजवारा उडाला आहे.
आधी सिवरेज लाईन टाकाव्यात -
झोपडपट्टीमध्ये शौचालय बांधण्याआधी सिवरेज लाईन टाकली पाहिजे. पालिका सोयी सुविधा न देता फक्त दावे आणि घोषणा करते. शौचालये उभारण्याआधी पालिकेने सिवरेज लाईन टाकाव्यात. याबाबत पालिका सभागृहात आवाज उचलू.
- रवी राजा, विरोधी पक्ष नेते, मुंबई महापालिका
अडसर त्वरित दूर करावेत -
घरोघरी शौचालय हा स्वच्छ भारत अभियानचा एक भाग आहे. इतक्या मोठ्या संख्येने अर्ज प्रलंबित का राहिले ते पालिका प्रशासनाने बघितले पाहिजे. सिव्हरेज लाईन नसल्यास किंवा इतर काही त्रुटी असल्यास त्या दूर कराव्यात. प्रशासनाने शौचालय उभारण्याचे कामातील अडसर त्वरित दूर करावेत.
- मनोज कोटक, गटनेते, भाजपा
- मनोज कोटक, गटनेते, भाजपा
पालिका गंभीर नाही -
महापालिकेकडून अनेक योजनांची घोषणा केली जाते मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. योजनांचा संबंधित विभागाकडून पाठपुरावा केला जात नाही. पालिकेकडे अभियंते, कंत्राटदार असूनही पालिका योजना राबवण्यात कमी पडत आहे. त्यामुळे योजना पूर्ण होत नाहीत. अधिकाऱ्यांवर जबाबदारी फिक्स करण्याची गरज आहे. अधिकारी कमी पडत असल्यास नवीन विभाग सुरू करावा. याबाबत पालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांचे लक्ष केंद्रित केले जाईल.
- अश्रफ आझमी, नगरसेवक, काँग्रेस
No comments:
Post a Comment