मुंबई - मुंबई महानगर पालिकेतील मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. याबाबत मनसेने कोंकण आयुक्तांकडे तक्रार केली होती. कोंकण आयुक्तांनी याप्रकरणी या नगरसेवकांच्या बाजूने निकाल दिला होता. मात्र पुन्हा या नगरसेवकांना सुनावणीसाठी हजर राहण्याची नोटिस पाठवण्यात आली होती, मात्र सुनावणीसाठी खुद्द कोंकण आयुक्तच गैरहजर राहिल्याने त्या नगरसेवकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
मनसेच्या दिलीप लांडे, हर्षला मोरे, दत्ता नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, अश्विनी माटेकर या सहा नगरसेवकांनी आपल्या पक्षाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला होता. या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने मनसेने कोंकण आयुक्तांकडे तक्रार करून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावेळीही सुनावणी दरम्यान कोंकण आयुक्त अनेक वेळा अनुपस्थित राहिल्याने उलटसुलट प्रश्न उपस्थित केले जात होते. या प्रकरणाचा निकाल काही महिन्यांपूर्वी लागला होता. कोंकण आयुक्तांनी मनसेमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा नगरसेवकांसह शिवसनेच्या 84 व 3 अपक्ष अशा 93 नगरसेवकांच्या गटाला मान्यता दिली होती.
कोंकण आयुक्तांच्या निकालामुळे पक्षप्रवेशाच्या प्रकरणावर पडदा पडला होता. मात्र कोंकण आयुक्तांनी पुन्हा या नगरसेवकांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची नोटिस बजावली आहे. सोमवारी या नगरसेवकांच्या वतीने ऍडव्होकेट अनिल परब तर मनसेच्यावतीने त्यांचे ऍडव्होकेट हजर होते. मात्र या सुनावणीस कोंकण आयुक्त जगदीश पाटील गैरहजर असल्याने सुनावणी न होता पुढील तारीख देण्यात आली. आता याप्रकरणाची सुनावणी पुढील सोमवारी 21 मे रोजी होणार आहे. सुनावणी पुढे ढकलल्याने त्या सहा नगरसेवकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
दरम्यान पालघर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा भाजपाकडून दबावतंत्राचा वापर केला जात आहे. आमच्या उमेदवाराने माघार घ्यावी म्हणून हा प्रकार केला असावा अशी प्रतिक्रिया सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment