मुंबई - एल्फिन्स्टन रोड स्थानकात २९ सप्टेंबर रोजी चेंगराचेंगरीत २२ जणांचा मृत्यू आणि ३४ जण जखमी झाले होते. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नये म्हणून प्रवाशांना शिस्त लावण्यासाठी आरपीएफ आणि जीआरपी यांनी कंबर कसली आहे. परळ स्थानकात गर्दीचे नियोजन करण्यासाठी खास उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच मध्य रेल्वेच्या सात स्थानकांवर प्रवाशांना पावसात थांबण्यासाठी २१५ चौरस फुटांचे आसरे तयार केले जाणार आहेत.
एल्फिस्टन दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पावसाची मोठी सर आली तर प्रवासी थेट स्थानकाबाहेर न पडता पाऊस थोडा कमी होण्याची वाट पाहत राहतात. त्यामुळे पाठीमागून प्रवाशांची गर्दी वाढत जाते. त्यामुळे प्रवाशांना पावसात थांबण्यासाठी मध्य रेल्वेच्या करीरोड, कुर्ला, ठाणे, मुंब्रा, कळवा, मुलुंड, नाहुर या सात स्थानकांत २१५ चौरस फुटांचे प्रवासी आसरे बनविण्यात येणार आहेत. तसेच परळ व एल्फिस्टन स्थानकात कॉर्पोरेट कार्यालयांमुळे गर्दी वाढत आहे. या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आरपीएफ, जीआरपी आणि महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे जवान तैनात करण्यात आले आहेत. या दोन स्थानकांची गर्दी एकाच ब्रिजवर होऊ नये यासाठी येथे परळच्या सीएसएमटी दिशेकडील अरुंद पुलावरून जादा गर्दी आली तर एल्फिन्स्टन रोड स्थानकातून येणारी गर्दी दोरीने काही काळ थांबविण्यात येणार आहे. तसेच एल्फिन्स्टन रोडच्या प्रवाशांना सीएसएमटी दिशेकडील पुलाकडून बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment