मुंबई - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानावरून मुंबई महापालिकेत पडसाद उमटले. स्थायी समितीत कचरा उचलण्याबाबतच्या प्रस्तावावरून सत्ताधारी शिवसेना आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या भाजपाने एकमेकांचे वाभाडे काढले. दरम्यान काँग्रेसने या संधीचा लाभ घेत भाजपाने सोयीस्कर पहारेकरी न बनता विरोधी पक्षात येऊन बसण्याचे आव्हान दिले.
स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत मुंबईत चार वार्डमधील कचरा खाजगी कंत्राटदाराकडून उचलण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. या प्रस्तावानुसार घराघरात कचरापेट्या देणे, कचरा उचलणे, तो कचरा वाहून नेणे इत्यादी सर्व जबाबदारी कंत्राटदारावर टाकण्यात आली आहे. पालिका आयुक्तांचा भ्रष्टाचाराविरोधात लढा सुरु असताना अंदाजित दरापेक्षा ११३ टक्के जास्त दराचा प्रस्ताव आणल्याने भाजपाच्या प्रभाकर शिंदे यांनी प्रस्तावाला विरोध केला. यावर बोलताना भाजपाच्या विद्यार्थी सिंग यांनी महापालिकेत मी इतके वर्ष नगरसेवक आहे. या काळात सर्वत्र नुसता भ्रष्टाचार दिसत आहे. ११३ टक्के जास्त दाराचे प्रस्ताव आणून भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात आहे. याकारणाने स्थायी समितीत बसायची लाज वाटत आहे. यापुढे स्थायी समितीत बसू की नको असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पालिकेची हालत अंधेर नगरी चौपट राजा अशी झाली आहे असा टोला सिंग यांनी यावेळी लगावला. सिंग यांनी सत्ताधारी शिवसेनेला थेट टोला लगावल्याने शिवसेनेचे नगरसेवक संतप्त झाले. मात्र भाजपाला अंगावर घेण्यास कोणीही धजावले नाही. शिवसेनेचे नगरसेवक गप्प बसून आपल्या पक्षावरील टिका ऐकून घेत असताना सेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांनी स्वच्छ भारत अभियानाची काय हालत झाली आहे ते केंद्रात जाऊन बघा. योजना नुसती बॅनरबाजी करून मार्गी लागत नाही. त्यासाठी शिवसेनेसारखे प्रयत्न करायाला हवेत. गेल्या काही वर्षात शिवसेनेनेच मुंबईकरांना सोयी सुविधा दिल्या असून पालिकेची तिजोरीही भरली आहे असे भाजपाला सुनावले. यावेळी प्रभाकर शिंदे यांनी भाजपाची काय चौकशी करायची ती करा, आमची कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्याची तयारी असल्याचे आवाहन पटेल यांना दिले. तसेच राजुल पटेल यांना मुद्द्यावर बोलण्यास सांगावे अशी मागणी शिंदे यांनी समिती अध्यक्षांकडे करून पटेल यांना चुप्प बसवले. दरम्यान काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रावी राजा यांनी भाजपा सोयीस्कर पाहरेकरी असल्याचा आरोप केला. भाजपाला आरोप करायचेच असतील तर त्यांनी हिंम्मत दाखवून विरोधी पक्षासोबत येऊन बसावे असे आवाहन रवी राजा यांनी केले. दरम्यान स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बैठकीत चाललेल्या गरमागरम चर्चेदरम्यान भाजपाला एकाकी पाडत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाला सोबत घेऊन सदर प्रस्ताव मंजूर करून घेतला.
No comments:
Post a Comment