मुंबई - पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये भाजपा सरकारने केलेल्या अन्यायकारक भरमसाट दरवाढीविरोधात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार, २४ मे रोजी सकाळी ११ वाजता भव्य मोर्चा कलिना हायवे ते कलेक्टर ऑफिस, वांद्रे पूर्व, मुंबई येथे काढण्यात येणार आहे.
मुंबई काँग्रेस कार्यालयामध्ये सर्व प्रमुख काँग्रेस नेत्यांची बैठक सोमवारी पार पडली. त्यामध्ये हा भव्य मोर्चाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला निरुपम यांच्यासह माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह, माजी खासदार एकनाथ गायकवाड, माजी आमदार चरणसिंग सप्रा, अशोक जाधव व मधू चव्हाण, मुंबई काँग्रेस महिला अध्यक्षा डॉ. अजंता यादव आणि सरचिटणीस भूषण पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. संजय निरुपम म्हणाले की, संपूर्ण भारत देश पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने त्रस्त आहे. त्यातच पेट्रोल आणि डिझेलचा दर संपूर्ण भारतात मुंबईमध्ये सर्वात जास्त आहे. मुंबईत पेट्रोल ८४ रुपये आणि डिझेल ७२ रुपये मिळत आहे, ही मुंबईकरांची अक्षरश: पिळवणूक आणि लूट होत आहे. मुंबईकरांनी असे कोणते पाप केले आहे म्हणून हे भाजपा सरकार मुंबईकरांना त्रास देत आहे? भाजपा सरकार पेट्रोल आणि डिझेल जीएसटीमध्ये का आणत नाही? असा सवालही त्यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment