मुंबई - मुबंईतील तलावांचे सुशोभीकरण करून या ठिकाणी मुंबईकरांना नौका विहाराची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीत मंजुरी मिळाली आहे.
मुंबई शहर व उपनगरात अनेक तलाव असून या तलावांमध्ये प्रामुख्याने गणेशोत्सव व नवरत्रोत्सवांमध्ये गणेश व देवीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येते. त्यानंतर या तलावांचा वापर होत नसल्याने त्यामध्ये शेवाळ व केरकचरा साचून दुर्गंधी निर्माण होऊन रोगराई पसरते. त्यामुळे पालिकेच्या तलावांतील केरकचरा काढून त्यांचे सुशोभीकरण करण्यात यावे व माफक शुल्क आकारून त्याठिकाणी नौकाविहाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून पालिकेला महसूल प्राप्त होऊन मुंबईच्या सौंदर्यात भर पडेल, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक अनिल पाटणकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. या ठरावाच्या सूचनेला २८ ऑक्टोबर २०१३ ला सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांकडे अभिप्रायसाठी पाठवला. यावर उत्तर देताना आयुक्तांनी म्हटले आहे की, मुंबई शहर उपनगरातील पालिकेच्या अखत्यारीतील विविध तलावांचे सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या तलावांमध्ये माफक शुल्क आकारून नौका विहाराची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विचार सुरू असल्याचा सकारात्मक अभिप्राय दिला होता. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीत मंजुरी मिळाल्याने मुंबईकरांना तलावांत आता नौकाविहाराची सुविधा उपलब्ध होणार आहे..