मुंबई - आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणा सज्ज आहेत. राज्य शासनाचे विविध विभाग तसेच महानगरपालिका, बेस्ट, एमएमआरडीए, महावितरण, मध्य रेल्वे,सिडको आदींनी आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने केलेली पूर्वतयारी, स्थापन केलेले कक्ष याबाबत माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात या विभागांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी ही माहिती देण्यात आली.
प्रारंभी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक शिवाजी मानकर यांनी या बैठकीचे प्रयोजन स्पष्ट केले. ते म्हणाले, दरवर्षी पावसाळ्यात मुंबई तसेच परिसराला छोट्या-मोठ्या आपत्तींना सामोरे जावे लागते. त्याबाबत आधीच पूर्वतयारी केल्यास आपत्तींची तीव्रता कमी करणे, टाळता येण्यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून उपाययोजना करणे शक्य होते. विविध विभागांनी जनसंपर्क अधिकाऱ्यांची ओळख होण्यासह समन्वयास सुलभता यावी यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
एमएमआरडीएचे सल्लागार आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माजी संचालक प्रल्हाद जाधव यांनी एमएमआरडीएमार्फत करण्यात आलल्या तयारीची माहिती दिली. एमएमआरडीएमार्फत मेट्रो मार्ग 2 व मार्ग 7 ची कामे सुरू असून मोनो रेल्वे सेवाही सुरू आहे. एमएमआरडीएमार्फत 4 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून 2 हॉटलाईन स्थापन करण्यात आले आहेत. तेथून बृहन्मुंबई महापालिकेशी अत्यल्प कालावधीत संपर्क साधता येतो. आपत्ती प्रतिसाद दल, प्राथमिक उपचार रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आले असून 1 जून ते 31 ऑक्टोबरपर्यंत 24x7 या तत्त्वावर आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 137 कर्मचाऱ्यांची या कक्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
दूरदर्शनच्या वृत्तसंपादक ज्योती अंबेकर यांनी आपत्ती व्यवस्थापनात दूरदर्शनचा कसा उपयोग होऊ शकतो याची माहिती दिली. दूरदर्शन हे माहितीचा विश्वसनीय स्रोत मानला जातो. त्यामुळे लोक दूरदर्शनच्या बातमीपत्रांना विशेष महत्त्व देतात. आपत्तीबाबत वस्तुस्थितीची योग्य माहिती देण्यासाठी दूरदर्शनशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
बृहन्मुंबई महानगर पालिकेने 1जून ते 30 सप्टेंबर दरम्यान महापालिका स्तरावर केंद्रीय आपत्ती नियंत्रण कक्ष तसेच 24 वार्डस्तरीय आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. 18 हॉटलाईनच्या माध्यमातून राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष, सर्व शासकीय तसेच लष्कर, नौदल, हवाई दल, पोलीस आदी विभागांशी तात्काळ संपर्क साधता येतो. महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये एक खोली गरजेच्या वेळी नागरिकांची तात्पुरती निवास व्यवस्था करण्यासाठी राखीव ठेवल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन कक्षासाठी 3 हजार 500 कर्मचारी वर्गाची नियुक्ती केली आहे. अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी विजय खबाले पाटील यांनी दिली.
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी पावसाळ्याच्या कालावधीत रेल्वे वाहतूक सुरळीत राहण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. राजभवनचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर, विधान मंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, लष्कराचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र विसपुते, नवी मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे, कल्याण डोंबीवली महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर, बेस्टचे जनसंपर्क अधिकारी हणुमंत गोफणे, महावितरणचे जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे, सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे, रिलायन्स एनर्जीचे सहायक जनसंपर्क अधिकारी विजेंद्र भावसार, मुंबई विद्यापीठाचे उप कुलसचिव डॉ. लीलाधर बनसोड यांनी आपापल्या विभागाच्या आपत्ती व्यवसापनाबाबतच्या पूर्व तयारीची माहिती दिली.