माहुलवासियांनी महापौरांना पळवून लावले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 June 2018

माहुलवासियांनी महापौरांना पळवून लावले

मुंबई - माहुल येथे प्रकल्पग्रस्तांसाठी बांधण्यात आलेल्या वसाहतीमधील नागरिकांना सोयी सुविधा देण्याच्या सूचना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रशासनाला दिल्या. मात्र त्या नंतरही सोयी सुविधा मिळत नसल्याने संतापलेल्या माहुलवासीयांनी गुरुवारी महापौरांना पळवून लावले. 

मुंबईत अनेक प्रकारची विकास कामे सुरु आहेत. या विकास कामात बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना माहुल येथे स्थलांतरित करण्यात येते. माहुलमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. काही वर्षातच इमारतींची अवस्था दयनीय झाली आहे. विभागात अस्वच्छता असल्याने नागरिक आजारी पडत आहेत. यामुळे येथील रहिवाशी गेले कित्येक वर्षे त्रस्त आहेत. मागील वर्षी माहुलला महापौरांनी भेट दिली होती. या भेटी दरम्यान महापौरांनी सोयी सुविधा देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या. या घटनेला एक वर्ष व्हायला आले आहे. तरी अद्याप काहीही प्रगती झालेली नाही. त्यामुळे रहिवाशांचा संतापाचा बांध फुटला होता. त्यातच महापौर या विभागाला भेट देत असल्याचे रहिवाशांना समजल्याने त्यांनी महापौरांना घेराव घातला. शौचालय नाही, असेल तर ती अस्वच्छ असतात. मच्छरांचा फैलाव वाढला आहे. टीबी, कॅन्सरसारखे आजार वाढत आहेत. लिफ्ट नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या विभागात गेले १५ दिवस वीज नसल्याची तक्रार नागरिकांनी महापौरांकडे केली. 

रहिवाशी आपल्या समस्या सांगत असताना महापौरांनी मीडियाकडे जाऊन बाईट देण्यास सुरुवात केली. संतापलेल्या नागरिकांनी महापौरांनी बाईट देताना गोंधळ घालण्यास सुरुवात केली. गेल्यावर्षी आला होतात त्यानंतर आज आला आहात. आम्हाला सुविधा नको येथून आमचे स्थलांतर करा अशी मागणी रहिवाशी करू लागले. नागरिकांकडून गोंधळ घातला जात असतानाच महापौरांनी तेथून काढता पाय घेतला. यावेळी महापौरांना पत्रकारांनी तुम्हाला रहिवाशांनी पळवून लावले असे विचारले असता आम्हाला कोणी पळवून लावलेले नाही. आम्ही फक्त पटापट चालत आहोत असे सांगून महापौरांनी वेळ मारून नेली. महापौरांसह सभागृह नेत्या विशाखा राऊत, सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे, सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर चौरे, संभाजी घाग इत्यादी उपस्थित होते. यावेळी रहिवाशी गोंधळ घालतील याची शक्यता असल्याने मुंबई पोलीस. पालिकेचे सुरक्षा रक्षकांसह खाजगी सुरक्षा पुरवणाऱ्या ईगल सिक्युरिटीचे सुरक्षा रक्षक महापौरांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते.

बिल्डरला तुरुंगात टाकायला हवे - 
मागील वर्षी माहुलला आलो तेव्हा परिस्थिती वेगळी होती, त्यात आता सुधारणा झाली आहे. बस आणि शाळा सुरु केली आहे. लवकरच हिंदी माध्यमाची शाळा सुरु केली जाईल. ड्रेनेज लाईन फुटल्या होत्या आता त्यात सुधारणा आहे. जातीने लक्ष घालून काम करून घेत आहोत. इमारतींमध्ये दरवाजे, खिडक्या नसताना लोकांनी कसे राहायचे ? रहिवाशांना ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा न देणारा बिल्डर याला जबाबदार आहे. बिल्डरवर कारवाई करून त्याला तुरुंगात टाकायला हवे.
- विश्वनाथ महाडेश्वर, महापौर

Post Bottom Ad