मुंबई -- जानेवारी महिन्यांत नायर रुग्णालयात झालेल्या एमआरआय मशीन दुर्घटनेत राजेश मारू या व्यक्तीचा बळी गेला. या दुर्घटनेनंतर ही एमआरआय मशीन बंद आहे. या मशीनची दुरुस्ती करण्याचा निणर्य़ प्रशासनाने घेतला असून दुरुस्तीसाठी तब्बल १.५३ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. दुरुस्तीसाठीच्या मोठ्या रकमेच्य़ा खर्चावरून वाद रंगण्याची शक्यता आहे.
महापालिकेने मे. फिलिप्स इं. लि. या कंपनीकडून ही एमआरआय मशीन ३ वर्षांच्या हमी कालावधीसह व ५ वर्षांच्या परिरक्षण कालावधीसह २००८ ला मंजुरीनुसार ७ कोटी ८९ लाख २८ हजार ८१३ रुपयांना खरेदी केली होती. २१ जानेवारी २०१७ रोजी या मशीनचा एकूण ८ वर्षांचा कालावधी संपला होता. त्यानंतर रुग्णसेवेकरीता वाढीव एक वर्षाचा परिरक्षण करार फिलिप्स कंपनीसोबत करण्यात आला होता. मात्र आणखीन पुढील १० वर्षांसाठी परिरक्षण करार करण्यापूर्वीच २८ जानेवारी रोजी ही दुर्घटना घडली व मशीन तेव्हापासून बंद पडली होती. आता रुग्णांची गरज व अडचण लक्षात घेता प्रशासनाने आता ही मशीन दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ही एमआरआय मशीन फिलिप्स कंपनीची असल्याने याच कंपनीकडून ती दुरुस्त करण्यात येणार आहे. या दुरुस्ती अंतर्गत स्पेअर पार्ट्सचा खर्च - ५६,६७,४२४२ रुपये, सर्विस ऍक्टिवीटी खर्च - २३,६०,००० रुपये, हेलिअम भरण्याचा खर्च - १३,७९,१८४ रुपये असा एकूण खर्च ९४, ०६,६०८ रुपये इतका असणार आहे. तसेच वार्षिक परिरक्षणाचा खर्च ५९, २७, १२८ रुपये इतका येणार आहे. यामुळे सर्वप्रकारचा एकूण खर्च हा १,५३,३३,७३६ रुपये इतका येणार आहे.
२८ जानेवारी २०१८ रोजी नायर रुग्णालयात एका रुग्णाचा नातेवाईक राजेश मारू या व्यक्तीचा रुग्णासोबत असलेल्या ऑक्सिजन गॅस सिलेंडरसह एमआरआय मशीनमध्ये ओढले गेल्याने त्यातच अडकून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद पालिका सभागृहात उमटले होते. पालिकेने ज्या ठिकाणी एमआरआय मशीन ठेवली होती तेथे प्रशिक्षित कर्मचारी, सुरक्षा रक्षक न ठेवल्याने व आवश्यक दक्षता न घेतल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवक व मृत राजेश मारू यांच्या नातेवाईकांनी केला होता.