मुंबई - दादर तसेच माहीम चौपाट्यांच्या साफसफाईसाठी कंत्राटदार नियुक्त करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या कामासाठी पालिकेने कंत्राटदाराला ११ कोटी ६० लाखांचे कंत्राट दिले आहे. यासंदर्भातील प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.
मुंबई शहरास सुंदर सागर किनाऱ्यांचे वरदान लाभले आहे. या विलोभनीय सागर किनाऱ्यांचा आनंद लुटण्यासाठी विविध ठिकाणांहून नागरिक मोठया संख्येने येतात. तसेच या समुद्रकिनाऱ्यांवर अनेक प्रकारचे धार्मिक विधी ,म्हणजेच नारळी पौर्णिमा, गणपती विसर्जन, छटपूजा पार पाडले जातात. किनाऱ्यालगत पिढ्यानपिढ्या राहणारे मच्छीमार देखील त्यांच्या व्यवसायासाठी या किनारपट्टयांचा वापर करत असतात. लोकांच्या मोठया प्रमाणातील राबत्यामुळे या किनाऱ्यांवर कचरा निर्माण होऊन अस्वछता निर्माण होते. त्याचबरोबर समुद्राच्या भरती ओहटीच्या आवर्तनांमुळे समुद्रातील बरेचसे तरंगते , ताज्य आणि प्लास्टिक इत्यादी प्रकारचा कचरा समुद्र किनाऱ्यावर मोठया प्रमाणात फेकला जातो. समुद्रकिनाऱ्यांवरील कचरा खाजगी कंत्राटदाराची नेमणूक करून काढला जातो .व समुद्रकिनारे यंत्र व मनुष्यबळाच्या सहाय्याने दररोज साफ केले जातात. मात्र त्यासाठी नेमण्यात येणाऱ्या कंत्राटदाराचे कंत्राट संपुष्टात आले आहे. त्यामुळे दादर व माहीम चौपाटयांची साफसफाई करण्यासाठी पालिकेने मे. विशाल प्रोटेक्शन फोर्स या कंत्रादाराची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. ६ वर्षांकरिता हे कंत्राट देण्यात आले असून त्यासाठी मनपा ११ कोटी ६० लाख रुपये खर्च करणार आहे.