मुंबई - नालेसफाई योग्य प्रकारे झाली नसल्याने पावसांत मुंबईत पाणी साचले. यावरून विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरत नाले सफाईचे दावे करता, मग मुंबई का तुंबली? असा सवाल केला. पालिका व सत्ताधा-यांचे हे अपय़श असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सभा तहकूबी मांडली. मात्र या विषयावर सभागृहाबाहेर टीका टिप्पणी करणा-या भाजपने सभागृहात मात्र विरोधकांना साथ न दिल्याने सभा तहकूबीची मागणी नामंजूर करण्यात आली. यावरून विरोधक - सत्ताधा-यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
मुंबईतील मान्सून पूर्व नालेसफाई, रस्ते कामांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र तरीही तुंबणा-या मुंबईशी मुंबईकरांना सामना करावा लागतो. यंदा नालेसफाई समाधानकारक झाल्याने पाणी तुंबणार नाही, असा दावा प्रशासन व सत्ताधा-य़ांनी केला होता. मात्र पहिल्याच पावसांत मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्याने मुंबईकरांचे हाल झाले. पालिका व सत्ताधा-यांच्या विरोधात मुंबईकरांनी तीव्र संताप व्यक्त करीत पुढे मुसळधार पावसांत काय होणार अशी चिंताही व्यक्त केली. याचे पडसाद सोमवारी स्थायी समितीत उमटले. नालेसफाई समाधानकारक झाली, पाणी तुंबणार नाही, असा दावा करणा-या प्रशासन व सत्ताधा-यांनी म्हटले होते. मग पहिल्याच पावसांत मुंबई तुंबली कशी? कोट्यवधी रुपये खर्च करून पंपिंग स्टेशन बांधले, मात्र तरीही हिंदमाता येथे कंबरेभर पाणी कसे साचले असा सवाल करीत विरोधक आक्रमक झाले. प्रशासन, सत्ताधा-यांच्या निष्क्रियेते विरोधात विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सभा तहकूबीची मागणी केली. मात्र सभागृहाबाहेर नालेसफाईवरून प्रशासन, सत्ताधा-यांवर टीका करणा-या भाजपने विरोधकांना साथ दिली नाही. याबाबतचे प्रस्ताव येतात, तेव्हा विरोधक गप्प राहून सत्ताधा-यांनाच साथ देतात. आम्ही सातत्याने विरोध करतो. मात्र विरोधक सत्ताधा-यांच्या सूरात सूर मिसळतात. तेव्हा गंभीर नसतात, आता गंभीर असल्याचा दिखावा केला जातो, असा टीका भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली. शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांनी प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या विभागातील नालेसफाईवर लक्ष ठेवल्यास असे प्रश्न विचारण्याची गरज भासणार नाही. आम्हाला पाठिंबा दिला नाही, म्हणून आम्ही का द्यायचा अशी भूमिका घेणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी भाजपचे लक्ष वेधले. सत्ताधारी- विरोधक तसेच भाजपमध्ये जोरदार राजकीय चिखलफेक करण्यात आली. यावर पाणी साचले असले तरी यापूर्वीप्रमाणे नाही, हिंदमाता येथे पाणी साचले, हे खरे असले तरी 30 मिनिटांत पाण्याचा निचरा झाला. येथील झाडांची मुळे खोलवर गेल्याने पाण्याचा निचरा होत नाही. ड्रेनबॉक्सचे काम सुरु असून काम पूर्ण झाल्यानंतर ही समस्या दूर होईल. पाणी साचू नये यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगत अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी प्रशासनाची बाजू सावरून धरली.